
सामना प्रतिनिधी । पुणे
अपघातात गेलेला जीव आपण परत आणू शकत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. हेल्मेटवापरासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, प्रबोधनही झालेले असल्याने १ जानेवारी २०१९पासून पुण्यात हेल्मेटची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले. यामुळे पुणेकरांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हेल्मेटसक्तीची भेट मिळणार हे निश्चित झाले आहे.
रस्ते अपघातात बहुतांश दुचाकीस्वारांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू होतो. अनेकदा अपघात किरकोळ असतो, शरीरावरील जखमा ही गंभीर नसतात; पण डोक्याला मार लागल्याने दुचाकीस्वारांचा बळी जातो. दुचाकी चालविताना हेल्मेट घातले पाहिजे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये हेल्मेट वापरले जाते. मात्र, पुण्यामध्ये हेल्मेट वापरण्यास विरोध केला जातो. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई केली तर याविरोधात आंदोलने केली जातात. त्यामुळे पुण्यात हेल्मेटसक्ती हा कायम वादाचा विषय राहिलेला आहे.
पुण्यात सुमारे २७ लाख दुचाकी आहेत. त्या तुलनेत हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे. सक्तीपूर्वी जनजागृती करावी असा आग्रह असतो. पोलिसांनी हेल्मेटवापराबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात केली असल्याने आता १ जानेवारीपासून याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
चौकाचौकात होणार कारवाई
हेल्मेट न घातल्याने एका चौकात ५०० रुपयांची पावती फाडली म्हणजे परत दिवसभरात दुसरी कारवाई होणार नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र, हेल्मेट न घालणाऱ्यांवर ज्या चौकात, रस्त्यावर पोलीस आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी कारवाई होणार आहे. दिवसभरात एकापेक्षा अनेकवेळा ही कारवाई होणार असल्याने हेल्मेट न घातल्यास डोक्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे.





























































