सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कचरा उचलणे आणि सफाईच्या कामासाठी ‘नियमित’ कामगारांना डावलून कंत्राटदाराची नेमणूक करणाऱ्या पालिका प्रशासनाला समन्वय समितीने दणका दिल्यानंतर सर्व ‘नियमित’ कामगारांना  ‘पदा’नुसार त्यांच्या विभागातच काम देण्याचे ठाम आश्वासन पालिका प्रशासनाने दिले. त्यामुळे आज चौथ्या दिवशी सफाई कामगारांचे ‘काम बंद’  आंदोलन मागे घेण्यात आल्याने आजपासून मुंबईभरात सुरू झालेली कचराकोंडी फुटली आहे.

पालिका प्रशासनाने कचरा उचलण्याचे काम कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे पालिकेचे नियमित हजारो कामगार जाणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे मंगळवारपासून कांदिवली, बोरिवली आणि दहिसरमध्ये समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ‘काम बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले होते. तर गुरुवारपासून मुलुंडमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले होते. तिसऱ्या दिवशीही पालिकेने या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आज शुक्रवारी संपूर्ण मुंबईत आंदोलन करण्यात आली. कचरा उचलायला कामगार नसल्याने मुंबईभरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले. या पार्श्वभूमीवर आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत समन्वय समिती, उपायुक्त विश्वास शंकरवार यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी कामगारांना त्यांच्या पदानुसार आणि विभागातच योग्य काम देईल असे आश्वासन प्रशासनाकडून दिले. यावेळी समन्वय समिती अध्यक्ष बाबा कदम, संजय वाघ, हेमंत कदम, महाबळ शेट्टी, सत्यवान जावकर, के. पी. नाईक, सुखदेव काशिद, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

मंगळवारी अहवाल सादर करणार

पालिकेच्या निर्णयानुसार सध्या चार विभागांत कंत्राटदाराकडून सफाई आणि कचरा उचलण्याचे काम करून घेण्यात येणार आहे. मात्र यामुळे नेमके किती कर्मचारी अतिरिक्त ठरणार, त्यांचे समायोजन कुठे करणार,   ‘कायम’, ‘हंगामी’ कर्मचाऱ्यांचे काय करणार याचा संपूर्ण अहवाल मंगळवारी स्थायी समितीला सादर केला जाणार आहे.

…तर प्रस्ताव ‘री-ओपन’ करा

संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असली तरी पालिका प्रशासनाने कंत्राटदाराचा फायदा करून घेण्यासाठीच कर्मचाऱ्यांबाबत स्थायी समितीला अंधारात ठेवल्याचा आरोप समन्वय समितीने केला. त्यामुळे या प्रस्तावाबाबत कंत्राटदाराच्या फायद्यासाठी प्रस्ताव बनवला गेल्याचे समोर आल्यास सदर प्रस्ताव ‘री-ओपन’ करण्याबाबतही विचार करण्यात येईल असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.