सासरच्यांनी मारहाण केल्याने खचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्ली पोलीस दलात काम करणाऱ्या सोहनवीर सिंह नावाच्या पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. सासरच्या मंडळींनी त्याला मारहाण केल्याने तो मानसिकरित्या खचला होता. मारहाणीचा सासरच्या लोकांनी व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याने सोहनवीर अधिकच गळाला होता. समाजात आपली बदनामी होईल या भीतीपोटी त्याने सर्व्हीस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडत आत्महत्या केली.

सोहनवीरचा प्रेमविवाह झाला होता. त्याची पत्नी देखील पोलीस दलात कामाला आहे. लग्नानंतर काही दिवसांत नवरा बायकोमध्ये भांडणं सुरू झाली होती. आपल्या बायकोचे पोलीस दलातीलच एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा सोहनवीरला संशय होता. यामुळे त्याने तिच्या घरच्यांना चिठ्ठी लिहली होती. चिठ्टीमध्ये त्याने तुमच्या मुलीला समजवा अशी विनंती केली होती. या चिठ्ठीचा उलटा परिणाम झाला. मुलीच्या घरच्यांनी ही चिठ्ठी लिहल्याबद्दल आणि बायकोवंर संशय उपस्थित केल्याबद्दल धडा शिकवायचं ठरवलं. सोहनवीरचा सासरा चमन काही नातेवाईकांसह सोहनवीरच्या घरी पोहोचला आणि त्याने सोहनवीरला घरातून फरफटत बाहेर काढत भर रस्त्यात मारहाण केली होती. हा प्रकार चारचौघात घडल्याने सोहनवीर भयंकर घाबरला होता.