
सामना ऑनलाईन । पालघर
पालघरच्या मासवण येथे माजी नायब तहसीलदार पंढरीनाथ संख्ये (72) यांचा तीन दिवसांपूर्वी झालेल्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संख्ये यांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी शुक्रवारी उशीरा अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे संख्ये यांनी त्यांच्या बंगल्यात परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळाली होती. महसूल खात्यातील माजी अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
मृत पंढरीनाथ संख्ये यांच्या डोक्यात एकाच छिद्रातून चार गोळ्या अडकल्याचे एक्सरेमध्ये निदर्शनास आले. त्यामुळे ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी संख्ये यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवला. मनोर पोलिसांना पोस्टमार्टेम अहवाल मिळाला असून एखादी व्यक्ती आपल्याच हातून एकाचवेळी सलग चार गोळ्या झाडू कशी शकते, असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे संख्ये यांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार मनोर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. संख्ये यांची हत्या का करण्यात आली याबाबत अधिक तपास पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक गौरव सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलिस ठाण्याच्या प्रभारी सिद्धवा जायभाये करत आहेत.

























































