महानगरपालिकेच्या निवडणूक: शिवसेनेची 18 जणांची यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । नगर

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी शिवसेनेने 18 जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत 50 उमेदवार शिवसेनेने घोषित केले असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

यावेळी दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, गिरीष जाधव, संदेश कार्ले, हर्षवर्धन कोतकर, रामदास भोर, विक्रम राठोड आदींसह पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपनेते अनिल राठोड म्हणाले, शिवसेनेने 18 जणांची यादी जाहीर केली आहे. केडगाव या दोन्ही प्रभागातील उमेदवारी घोषित करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी कै. संजय कोतकर यांच्या पत्नी सुनीता संजय कोतकर यांना 16 मधून आम्ही उमेदवारी दिली आहे. या प्रभागांमध्ये कोतकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी हर्षवर्धन कोतकर यांनी केली होती. त्याचा सन्मान आम्ही ठेवला आहे. त्यामुळे हर्षवर्धन कोतकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन कोतकर यांनी पक्षासाठी त्याग केला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेनेची आजपर्यंत त्यागाची परंपरा कायम असून हर्षवर्धन कोतकर यांनी त्यागाची भूमिका घेऊन केडगावमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे स्पष्ट केले आहे.

नगर शहरांमध्ये ज्या ठिकाणी या अगोदर उमेदवार शिवसेनेकडून उभे राहत नव्हते त्या ठिकाणी आम्ही विक्रम राठोड व योगीराज गाडे यांना उमेदवारी दिली आहे. पण आम्ही घराणेशाही करणारे आम्ही नाही, आमचा आमदार, आमचाच महापौर व आमच्या घरात जिल्हा परिषद सदस्य असे पदे शिवसेनेमध्ये नाही असेही उपनेते राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.

अनिल राठोड म्हणाले की, शिवसेनेने बाबत काही अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र तशी कुठलीही परिस्थिती नाही. हर्षवर्धन कोतकर यांनीही याबाबत खुलासा करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भाजपातील काही कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचा दावाही राठोड यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना व भाजपाचे मतदार एकच आहेत. या मतदारांशीच आमची युती असल्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 18 उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी (दि.17) जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेने आत्तापर्यंत 50 उमेदवार जाहीर केले असून अंतिम यादी लवकरच जाहीर होईल, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार पुढील प्रमाणे : हेलन पाटोळे – प्रभाग 1 अ, दमयंती नांगरे – प्रभाग 1 ब,
भास्कर पांडुळे – प्रभाग 3 ड, संगीता केरुळकर – प्रभाग 4 ब, बलराम सचदेव – प्रभाग 4 ड, सारिका भुतकर – प्रभाग 6 अ, पुष्पाताई वाकळे – प्रभाग 6 क, जयश्री सोनवणे – प्रभाग 9 अ, कविता दहिफळे – प्रभाग 9 ब,
गौरव ढोणे – प्रभाग 9 ड, अरुणा गोयल – प्रभाग 11 अ, सुनीता मैड – प्रभाग 11 क,
शांताबाई शिंदे – प्रभाग 16 अ, सुनीता कोतकर – प्रभाग 16 ब, विजय पठारे – प्रभाग 16 क, अमोल येवले – प्रभाग 16 ड, सुभाष कांबळे – प्रभाग 17 अ, मनीषा कारखेले – प्रभाग 17.