
राजेश देशमाने । बुलढाणा
महिनाभरावर नवीन वर्ष येवून ठेपले असून बाजारात नवीन वर्षाची दिनदर्शिका येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बुलढाण्यातील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक सदानंद काने यांनी स्पोर्ट कॅलेंडर, क्रिकेट इंडिया कॅलेंडर, परमवीरचक्र विजेता कॅलेंडर, हमारा संविधान कॅलेंडर, मातृदेव भव कॅलेंडर, मराठी साहित्यिक दिनदर्शिका, साऊंड कॅमेरा एक्शन कॅलेंडर, चित्पावण दिनदर्शिका, लहान मुलांचे शौर्य पुरस्कार कॅलेंडर, असे आगळेवेगळे माहितीपर नवीन वर्षाचे कॅलेंडर विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेट देण्यासाठी स्वखर्चाने काढले आहे. हे कॅलेंडर नागपूर येथे हिंदुस्थानचे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना भेट दिले असता त्यांनी अप्रतिम, सुंदर या शब्दात काने सरांचे व कॅलेंडरचे कौतुक करुन जगात अशा प्रकारची कॅलेंडर कुणी काढली नाही असे गौरवोद्गार काढले.
बुलढाण्यातील एडेड हायस्कूलचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक सदानंद श्रीपाद काने हे क्रीडा शिक्षक असल्यामुळे त्यांना सुनिल गावस्कर, सचिन तेंडूलकर, अजित वाडेकर, किरण मोरे, चेतन चव्हाण, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, अंजली भागवत, महेंद्रसिंग धोनी, क्रीडा क्षेत्रातील अशा अनेक मान्यवरांशी त्यांचा स्नेह संबंध आहे. सध्या सदानंद काने हे क्रीडा भारतीचे काम करत असून त्यांच्या मनात विचार आला की, आपण आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या जन्मतारखेचे कॅलेंडर तयार करावे. त्यांनी माहिती संकलन करण्यास सुरुवात केली असता त्यांना एक हजार विविध खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या जन्मतारखा मिळाल्या. मग आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या जन्मतारखेचे स्पोर्ट कॅलेंडर तयार केले.
त्यानंतर हिंदुस्थानातील सर्व आतापर्यंतच्या क्रिकेटपटूंवर क्रिकेट इंडिया हे दुसरे कॅलेंडर तयार केले. यामध्ये क्रिकेटपटूंच्या जन्मतारखांचा उल्लेख आहे.
तिसरे कॅलेंडर परमवीर चक्र विजेता कॅलेंडर तयार केले. यामध्ये अशोक चक्र, महावीर चक्र, वीरचक्र, विजेत्यांची संपूर्ण माहिती प्रत्येक तारखेला आहे. देशातील लोकांना प्रत्येक दिवशी या एका जवानाचे स्मरण व्हावे हा उद्देश त्यामागचा आहे.
त्यानंतर चौथे कॅलेंडर हमारा संविधान कॅलेंडर तयार केले. आपल्या संविधानात ३९५ कलमा आहेत. कॅलेंडरवर प्रत्येक तारखेला एक कलम याप्रमाणे ३६५ कलमा टाकून उर्वरीत कलमा शेवटच्या पानावर टाकून हे कॅलेंडर तयार केले आहे. या सर्व कलमा भारतीयांना माहिती व्हाव्या हा त्यामागचा उद्देश आहे.
पाचवे कॅलेंडर हे मातृदेव भव या नावाने तयार केले. या कॅलेंडरमध्ये जगातील सर्वश्रेष्ठ महिलांचे फोटोसह जन्मतारखा प्रत्येक पानावर छापण्यात आल्या आहे.
सहावे कॅलेंडर शौर्य चक्र पुरस्कार कॅलेंडर तयार केले. यामध्ये २६ जानेवारीला लहान मुलांना उल्लेखनिय कार्याबद्दल शौर्यचक्र पुरस्कार राष्ट्रपतींकडून देण्यात येतो. आतापर्यंतच्या सर्व शौर्य चक्र पुरस्कार प्राप्त लहान मुलांची माहिती या कॅलेंडर मध्ये आहे.
सातवे कॅलेंडर साऊंड कॅमेरा एक्शन कॅलेंडर हे तयार केले. जगातील चित्रपट क्षेत्रातील सर्व नट-नट्यांच्या जन्मतारखा फोटोसह या कॅलेंडरमध्ये छापले आहे.
त्यानंतर आठवे कॅलेंडर मराठी साहित्यिक दिनदर्शिका तयार केले. यामध्ये सर्व मराठी साहित्यिक कवि, लेखक, कादंबरीकार यांचे वाढदिवस आहे. हे कॅलेंडर तयार आहे. परंतु त्याचे प्रकाशन ते जानेवारीत यवतमाळ येथे होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करणार आहे.
आणि नववे कॅलेंडर तयार केले ते चित्पावन दिनदर्शिका या चित्पावन दिनदर्शिकेत सर्व कोकणस्थ ब्राह्मणांची ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव देशात-जगात मोठे केले. यांची संपूर्ण माहिती आहे.
असे अफलातून २०१९ चे कॅलेंडर सदानंद काने यांनी स्वखर्चाने तयार करुन ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेट देतात. परंतु कोणी दाता मिळाला तर हे कॅलेंडर मोठ्या प्रमाणात छापून महाराष्ट्रातील सरकारी कार्यालये, शाळा यांना भेट देण्याची सदानंद काने यांची इच्छा आहे.
सदानंद काने यांनी क्रीडा शिक्षक असताना किक अॅन्ड थ्रो बॉल व स्क्वेअर क्रिकेट हे दोन नविन खेळ तयार करुन ३५ जिल्ह्यात जावून त्यांचा प्रचार प्रसार करुन सामने घेतले आहे. हे खेळ शासनाने स्विकारावे यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. परंतु जगावेगळी कॅलेंडर काढून सदानंद काने यांनी आपला ठसा उमटविला आहे.





























































