
सामना प्रतिनिधी। कोपरगाव
तालुक्यातील मायगावदेवी १६५ येथील २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र तिस-यांदा चोरीला गेले असून अद्याप दुसरे वीज रोहित्र न मिळाल्याने पाणी असूनही रब्बी व भूसार पिकांना देता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात उभी असलेली पिके करपू लागली आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरूध्द चीड व्यक्त होत आहे.
सहकार महर्षी कोल्हे कारखान्यांचे सुरक्षा अधिकारी व मायगांवदेवीचे शेतकरी अकबरभाई शेख यांनी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता एन आर निकम यांच्याकडे याबाबतची रितसर तक्रार नोंदविली आहे. मात्र याबाबत वीज वितरण कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही. सध्या ज्या शेतक-यांकडे थोडयाफार प्रमाणांत पाणी आहे ते गहु, कांदे आदि भूसार पिकाची लागवड करीत आहे, मायगांवदेवी परिसरातील शेतकरीही रब्बीची लागवड करीत आहेत. यापूर्वी दोन वेळा वीज रोहित्र चोरीस गेले आणि आता तिस-यांदा हे रोहित्र चोरीस गेल्यांने ग्राहक व शेतकरी हवालदिल आहेत. या वीज रोहित्रास वेल्डींग केली असती तर ते चोरीस गेले नसते असे या परिसरातील ग्राहकांचे म्हणणे आहे. वीज रोहित्रातील ऑईलची मोठया प्रमाणांत चोरी व्हायची. पण आता थेट वीज रोहित्रच चोरीस जायला लागल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.































































