
सामना प्रतिनिधी । नागपूर
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, रेल्वेतून पसार झाला. ही घटना बोदवड रेल्वे स्टेशन येथे घडली आहे. सतीश उर्फ छोट्या जैमुख काळे रा. तळोजा असे फरार आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ माजली आहे.
सतीशला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. नाशिक येथे सुरू असलेल्या केसच्या सुनावणी करीता न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला नागपूर पोलिसांचे पथक २६ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने घेऊन जात होते. वाटेत २७ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३०च्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्टेशनवर तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.




























































