भाजपचे माजी खासदार गुणवंतराव रामभाऊ सरोद यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सावदा

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे पहिले आमदार व खासदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. गुणवंतराव रामभाऊ सरोदे (वय ७८) यांचे आज रविवार दि. २ डिसेंबर रोजी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी खासदार डॉ. गुणवंतराव रामभाऊ सरोदे यांच्यावर सावदा येथे आज दुपारी ४ वाजता त्यांच्यावर शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निधनाचे वृत्त कळताच भाजपासह विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. डॉ. गुणवंतराव सरोदे यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे माजी उपाध्यक्ष म्हणुन जबाबदारी संभाळली होती. भारतेश्वर मंदिराजवळील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी डॉ. सरोदे त्यांच्या पत्नी श्यामला सरोदे यांचे निधन झाले होते. डॉ. सरोदे यांच्या पश्चात मुलगा, सुन, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. गुणवंत सरोदे यांचा जन्म रावेर तालुक्यातील मस्कावद येथे ३ एप्रिल १९४०ला झाला. वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षण त्यांनी पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातुन पूर्ण केले. त्यानंतर रावेर तालुक्यातील सावदा येथे वैद्यकीय सेवा सुरु केली. ग्रामीण भागातील गरीबांचा डॉक्टर म्हणून त्यांना ओळखले जायचे. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या डॉ. सरोदे यांनी १९७८मध्ये तत्कालीन जनता पार्टीच्या तिकिटावर रावेर विधानसभेची निवडणूक लढली. १९८०मध्ये स्थापन भाजपचे ते जळगाव जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष होते. १९८५ मध्ये प्रथमच ते रावेरमधून आमदार झाले. सन १९८९ मध्ये त्यावेळच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. सन १९९१ मध्ये लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. सन १९९६मध्ये त्यांना खासदार म्हणून पुन्हा पसंती मिळाली. जळगाव जिल्ह्यात भाजपचे पहिले आमदार व पहिले खासदार होण्याचा मान डॉ. सरोदेंना जातो. सन १९९५मध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. अलीकडेच २०१६ ला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. सरोदेंचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला होता.