जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात नदीजोड प्रकल्पासाठी आमरण उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामनेर 

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचा ’होम ग्राऊंड’ असलेल्या जामनेर तालुक्यात नदी जोड प्रकल्पासाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. तालुक्यातील पहुर येथील शिवसेना शाखा तसेच वाघूर विकास आघाडीच्यावतीने नदीजोड प्रकल्प लवकर व्हावा या मागणीसाठी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

शिवसेना पहुर शाखा आणि पहुर येथील रहिवाशी सुकलाल बळीराम बारी यांच्या नेतृत्वातील वाघूर विकास आघाडी यांच्यावतीने जामनेर तहसील कार्यालयासमोर आज पासून आमरण उपोषणास बसले आहेत. तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यासाठी जीवनदायिनी समजल्या जाणार्‍या तापी नदीच्या उगम स्थानावर पावसाळ्यात मुबलक पर्जन्यवृष्टी होत असते. यामुळे सतत हातनूर धरणाचे ३० ते ३५ दरवाजे उघडले जातात. त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होवून पाणी वाया जाते. त्याअनुषंगाने तापी नदीचे वाहून जाणारे पाणी डाव्या कालव्याने बोदवड, फत्तेपुर, कापुसवडी मार्गे वाघूर नदीस जोडण्याची मागणीशासन दरबारी सन २०१२ पासून सुरु आहे. मात्र त्याकडे तत्कालीन आघाडी सरकाने आणि  आता भाजप सरकारने देखील दुर्लक्ष केलेले दिसते. यामुळे आता   उपोषणाच्या माध्यमातून ही मागणी करावी लागत आहे.

ही मागणी पूर्ण झाल्यास जामनेर तालुक्यातील  कांग, सूर, खडकी, वाघूर, सोन या लहान नद्या पावसाळा सुरु होण्यापूर्वीच भरभरून वाहायला लागतील. पर्यायाने दुष्काळ कायम स्वरूपी संपुष्टात येईल. याप्रमुख मागणीसाठी अधिवेशनात उपोषण करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले गेले  आहे. जामनेर तालुक्यातील जलसंपदामंत्री असून देखील लक्ष दिले जात नसल्याची खंत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ मनोहर पाटील, तालुका प्रमुख पंडितराव जोहर यांनी व्यक्त केली. वाघूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुकलाल बारी   यांनी वेळो वेळी निवेदन, मागण्या अधिकारी पदाधिकारी  मंत्री यांच्याकडे केली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनात उपोषण सिद्धा करून शासनाने दुर्लक्षित केल्याने वाघूर विकास आघाडी व शिवसेना पहुर शाखेच्या वतीने जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावात जलयात्रा काढून जनजागृती करून नदीजोड प्रकल्पास पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला असल्याची माहिती दिली.

आपल्याच तालुक्यातील उपोषणाकडे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दुर्लक्ष केले आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी दिला आहे.

उपोषणस्थळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ मनोहर पाटील, तालुकाप्रमुख पंडित जोहरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख रवींद्र पांढरे, शहर प्रमुख पवन माळी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित आहेत.