
सामना प्रतिनिधी । मुंबई
दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमातील भाषा विषयाची कृतिपत्रिका वेळेत कशी सोडवायची याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना एका व्हिडीओमधून पाहता येणार आहे. बालभारतीच्या यूट्यूब वाहिनीवर सर्व भाषा विषयांच्या कृतिपत्रिका तसेच अन्य विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपावर आधारित मार्गदर्शनपर व्हिडीओ 6 डिसेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. www.ebalbharati.in या वेबसाइटवर यूट्यूब वाहिनीची लिंक असून व्हिडीओ पाहून विद्यार्थ्यांनी सबस्क्रिप्शन करायचे आहे.
व्हिडीओमध्ये उत्तराच्या संदर्भातील विषयतज्ञांचे मत व्यक्त करणारे व्हिडीओ दिले जाणार आहेत. हा व्हिडीओ पाहून विद्यार्थ्यांनी होत असलेल्या चुका सुधाराव्यात, असे आवाहन पाठय़पुस्तक मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी केले आहे. 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत अनुक्रमे प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, विज्ञान-1, विज्ञान-2, गणित – 1, गणित – 2, इतिहास – राज्यशास्त्र आणि भूगोल या क्रमाने व्हिडीओ उपलब्ध होणार आहेत.






























































