
अजय जोशी । पाटोदा
बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरूवारी येत आहे. या पथकामध्ये 14 सदस्य असणार आहेत. हे पथक तालुक्यात विविध ठिकाणी भेटी देणार असल्याचे सांगितले जाते. तालुक्यात पाणी बाणी निर्माण झाली आहे. हे पथक तालुक्याला काही मदत करणार का असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात आहे. पाटोदा तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. कापूस, तुर ही पिके जमिनीवरच जळून गेली आहेत. पाणी नसल्याने ऊसाचे पीक हातचे गेले आहे. या पथकांनी वरवरची पाहणी न करता बांधावर जाऊन पाहणी करावी म्हणजे खरी दुष्काळाची दाहकता समजेल. यंदा अल्प पाऊस पडल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याने भागविण्यात येत आहे. सध्या तालुक्यातील 27 प्रकल्पांमध्ये पाणी पातळीने तळ गाठला आहे. तर काही प्रकल्प कोरडे पडले आहेत. कुपनलिका बंद पडत आहेत. विहिरी आटल्या आहेत. केंद्राचे पथक दुष्काळाचे गंभीरपण समजून घेऊन मदत करणार की पुन्हा तोंडाला पाने पुसून शेतकऱ्यांची चेष्टा करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागेल आहे. पथका मध्ये राज्यातील क्रषी मंत्रालय सचिव एकनाथ डवले,क्रषि आयुक्त पुणे सचिंद्र प्रतापसिंह ,मदत पुर्नवसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर,श्री राजणकर यांचा समावेश असणार आहेत.
























































