मुंबईचा गारवा फक्त दोन दिवस, थंडीसाठी 15 दिवस वाट बघा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cold-wave

सामना प्रतिनिधी, मुंबई

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर गारव्याचा अनुभव घेत आहेत. पहाटे आणि संध्याकाळनंतर मुंबईत थंड वारे वाहत असून अनेक ठिकाणी शेकोटय़ाही पेटलेल्या दिसत आहेत. मुंबईचे किमान तापमान आज सोमवारी 16 डिग्री सेल्सियस इतके होते. सगळय़ांनी गरम कपडे कपाटातून बाहेर काढले असतील; पण ते केवळ दोन दिवस परिधान करता येतील. कारण, हा गारवा गायब होणार असून थंडीसाठी आणखी 15 दिवस वाट बघावी लागेल असे स्कायमेटने म्हटले आहे.

ही थंडी नसून केवळ गारवा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. रविवारी मुंबईचे तापमान 17 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले. या मोसमातले हे सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर सोमवारी आणखी 1 डिग्रीने खाली आले.

का घसरले तापमान?
उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईचे तापमान घसरल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. मध्य प्रदेशात सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे मुंबईतही गारव्याचा अनुभव आहे. प्रत्यक्षात मुंबईत थंडी 21 डिसेंबरनंतर येण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटच्या महेश पलावत यांनी सांगितले.

मराठवाडा, विदर्भाचे तापमान वाढले
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढले असून तेथे पाऊस पडत आहे. मात्र, येत्या 24 ते 48 तासांत ही परिस्थिती बदलेल आणि येथील तापमान घसरून पाऊसही थांबेल, असा अंदाजही स्कायमेटने व्यक्त केला आहे.

गेल्या 2 दिवसांपासून मुंबईचे तापमान चांगलेच घसरले असून या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱया वाऱयांमुळे हे तापमान घसरले असून पुढचे दोन दिवस मुंबईचे तापमान कमीच राहील असा अंदाज आहे.
-कृष्णानंद होसाळीकर, उपसंचालक, कुलाबा वेधशाळा

गोरेगाव ठरले सर्वात थंड
कुलाबा 20
वरळी 18
सांताक्रुझ 16
माझगाव 19
वांद्रे 18
अंधेरी 17
गोरेगाव 14
कांदिवली 16
बोरीवली 16
चेंबूर 18
भांडुप 15
मुलुंड 17