बेवारस वाहनांची माहिती व्हॉट्सऍपवर !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील रस्त्यांवर बेवारस आणि धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या वाहनांवर ठोस कारवाई करण्यासाठी पालिकेने अशा वाहनांची माहिती देण्यासाठी व्हॉट्सऍप आणि टोल फ्री क्रमांक व ई-मेल आयडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नंबर लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या धोक्याचा प्रश्न सुटणार आहे.

मुंबईच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यातच मुंबईत दररोज शेकडो नवीन वाहनांची भर पडते. मुंबईकरांची सुरक्षा व होणारी गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. महेश बेडेकर यांनी बेवारस वाहनांवर कारवाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पालिका प्रशासनाला बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अशी असणार सेवा
तक्रारदाराला सकाळी 8 ते 8 रात्रीपर्यंत माहिती देण्यासाठी सेवा उपलब्ध असेल. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत सेवा असेल. बेवारस वाहनांवर कारवाईची माहितीही तक्रारदारांना देण्यात येईल. हा प्रस्ताव पालिका अधिनियम 1888 च्या सुधारित कलम 72 (3) अन्वये स्थायी समितीकडे मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा क्रमांक कार्यान्वित करण्यात येईल.

या कामासाठी टीएलसी क्हेईकल असिस्ट प्रा. लि. या कंपनीला एक कर्षासाठी कंत्राट देण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका प्रशासन 4 लाख 80 हजार रुपये खर्च करणार आहे. तसेच या कामास पालिका आयुक्तांनीही मंजुरी दिली आहे.