‘मोनो रेल’च्या स्थानकाखाली चोरांचा अड्डा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आर्थिक दुष्टचक्रात अडकलेल्या मोनो रेलला आता गर्दुल्ले, भुरट्या चोरट्यांचा डेरा पडला आहे. वडाळा डेपो स्थानकावर वीज कोसळल्यास हानी होऊ नये म्हणून लावलेल्या विजेच्या अर्थिंग वायरच्या ताराच चोरट्यांनी उचकटून पळविल्या आहेत. मोनो रेलच्या स्थानकांना महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची सुरक्षा असतानाही हे घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोनो रेलच्या वडाळा डेपो येथे स्थानकाखाली संध्याकाळनंतर अंधाराचे साम्राज्य असते. शेजारील झोपडपट्टीतील रहिवासी येथे बिनधास्त पथारी पसरून झोपलेले असतात. येथे रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही असतात. त्यांनी फोडलेल्या बीअर तसेच मद्याच्या बाटल्यांचा येथे खच पडलेला असतो. येथे स्थानकाच्या पिलरवरून आलेल्या अर्थिंगच्या वायर उचकटून काढलेल्या निदर्शनास आले आहे. सामान्यतः अर्थिंगसाठी तांब्याच्या धातूच्या पट्टया जमिनीत पुरलेल्या असतात त्याच गर्दुल्ल्यांनी पळविलेल्या दिसत आहेत. पावसात जर स्थानकावर वीज पडली तर ती जमिनीत शोषून घेण्याचा मार्ग बंद पडला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पर्यटनासाठी वापर करावा अशी मागणी

गेल्या वर्षी आगीच्या घटनेनंतर मोनो रेलच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता मोनो रेल चेंबूर ते वडाळा डेपोपर्यंत सुरू असून तिला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. 80 कोटींचा तोटा झालेल्या मोनो रेल पर्यटनासाठी एखाद्या खासगी एजन्सीला द्यावी असे तज्ञांचे म्हणणे आहे. व्यवस्थापन ‘एमएमआरडीए’ने आपल्या ताब्यात का घेऊ नये यावर विचारमंथन सुरू आहे. मोनो रेलचा दुसरा टप्पा वडाळा ते सात रस्ता हा अजूनही सुरू झालेला नसून त्यासाठी जादा गाड्यांची गरज आहे.