
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बहुजन समाजवादी पक्षाच्या (बसप) अध्यक्षा मायावती यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसची चिंता मिटली असून आता छत्तीसगड सोबतच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘भाजपकडून सत्तेसाठी साठमारी सुरू आहे. आकड्यांचं गणित जुळवण्यासाठी ते धडपड करत आहेत. मात्र त्यांचा हा हेतू मी पूर्ण होऊ देणार नाही. काँग्रेसच्या धोरणांशी मी असहमत असले तरी देखील मध्य प्रदेशात काँग्रेसला पाठिंबा देत आहे. गरज पडल्यास राजस्थानमध्ये देखील काँग्रेसलाच समर्थन देईन’, अशी स्पष्ट भूमिका आज मायावती यांनी जाहीर केली.
मायावती यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसला दिलास मिळाला असून भाजपला मध्य प्रदेशातील सत्तेवरून पाय उतार व्हावे लागणार, असे स्पष्ट दिसत आहे.
#WATCH: “To keep BJP out of power we have agreed to support Congress in Madhya Pradesh and if need be in Rajasthan, even though we don’t agree with many of their policies,”says Mayawati, BSP #AssemblyElections2018 pic.twitter.com/1gr6RFRZHO
— ANI (@ANI) December 12, 2018
दरम्यान, काँग्रेसच्या गटाला भेट घेण्यासाठी म्हणून राज्यपालांनी 12 वाजता बोलवले आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता काँग्रेसच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांची बैठक आहे. या बैठकीत काँग्रेसला समर्थन देणारे बसप आमदार आणि काँग्रेस समर्थक अन्य अपक्ष आमदार येथे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



























































