
सामना प्रतिनिधी । राहुरी
रस्ता ओलांडत असताना आईच्या मागे चाललेला ६ वर्षाचा चिमुकला बोलेरो जीपखाली सापडुन जागीच ठार झाला. नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या जोगेश्वरी आखाड्या जवळील हॉटेल साईदर्शन जवळ आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली.
रवींद्र निंबाळकर व त्यांची पत्नी या मार्गावरील हॉटेलवर कामावर आहेत. सकाळी निंबाळकर यांची पत्नी नगर मनमाड राज्य रस्ता ओलांडत असताना ६ वर्षाचा सूरज आईच्या मागे रस्त्यावरून चालला होता. यावेळी कोल्हारकडून नगर दिशेला चाललेल्या बोलेरो जीपच्या चाकाखाली सूरज सापडल्याने जागीच ठार झाला.
निंबाळकर कुटूंबात सूरज हा एकुलता एक मुलगा होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरजला पाहुन आईने हंबरडा फोडला. आज दुपारी राहुरी येथे शव विच्छेदना नंतर सूरजचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने राहुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





























































