
हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात 36 राफेल अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. मात्र ही संख्या आता 32 वर आल्याचा दावा ‘फ्लाईट ग्लोबल’ या ब्रिटिश नियतकालिकाने केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ही संख्या कमी झाल्याचे या अहवालात म्हटले असून पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षादरम्यान पाकिस्तानने राफेल विमाने पाडल्याच्या दाव्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ही चार विमाने गायब झाली असून ती कुठे गेली, असा सवाल देशभरातून विचारण्यात येत आहे.
एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांना नष्ट केले होते. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. यावेळी पाकिस्तानने हिंदुस्थानची राफेल विमाने पाडल्याचा दावा केला होता. हिंदुस्थानी हवाई दलाने हा दावा सातत्याने फेटाळला होता, मात्र ‘फ्लाईट ग्लोबल’ या नियतकालिकाने राफेलबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मे 2025 मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या संघर्षापूर्वी हिंदुस्थानकडे 35 राफेल विमाने होती. आता यापैकी 32 विमाने सेवेत असल्याचा दावा या नियतकालिकाने केला आहे. हिंदुस्थानने 2015-16 मध्ये सुमारे 63 हजार कोटी रुपयांमध्ये 36 राफेल विमाने खरेदी केली होती. एका राफेलची किंमत सुमारे 686 कोटी रुपये एवढी आहे.
‘फ्लाईट ग्लोबल’ने सूत्रे तपासावी
हवाई दलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल एन. तिवारी यांनीही हा अहवाल फेटाळला आहे. नियतकालिकाने स्वतःच्या सूत्रांची विश्वसनीयता तपासावी. जी राफेल विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता ती विमाने हवाई कवायतींदरम्यान उडताना दिसली होती. हवाई दलाची वैमानिक शिवांगी सिंह यांना ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान बंदी बनविण्यात आल्याचा दावाही याच सूत्रांनी केला होता, मात्र त्यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते, असे तिवारी म्हणाले.
विमानांची संख्या कशी मोजली जाते?
‘सीरियम’ या संस्थेच्या माहितीवर आधारित आकडेवारी ‘फ्लाईट ग्लोबल’मध्ये प्रसिद्ध करण्यात येते. हवेत झेपावणाऱया विमानांचे सार्वजनिक निरीक्षण, ट्रकिंग, ओपन सोर्स डेटा तसेच संरक्षणविषयक अहवालांच्या आधारे आणि विमानांच्या शेपटीवरील क्रमांकाच्या आधारे विमानांच्या ताफ्याचा आढावा घेण्यत येतो. त्यानंतर सक्रिय विमानांची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही केला होता दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान चार ते पाच विमाने पडल्याचा दावा केला आहे, मात्र ही विमाने कोणत्या देशाची होती, हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. त्यांच्या मध्यस्थीने आणि टॅरिफ लावण्याच्या धमकीनंतर हा संघर्ष थांबल्याचाही दावा त्यांनी केला होता.
सक्रिय विमानांची संख्या घटली
हिंदुस्थानने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती. वर्ष 2025 च्या अखेरीस ‘फ्लाईट ग्लोबल’ने 35 राफेल विमाने सक्रिय असल्याचा उल्लेख केला होता. आता नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा आकडा 32 असल्याचे म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तत्कालीन सैन्यदल प्रमुख अनिल चौहान यांनी म्हटले होते की, किती विमाने पडली हे महत्त्वाचे नाही, ती का पडली हे महत्त्वाचे आहे. चौहान यांनीही विमाने पडल्याचे फेटाळले होते.
हिंदुस्थानने दावा फेटाळला
राफेल विमानांची संख्या घटल्याचा दावा हिंदुस्थानच्या हवाई दलाने फेटाळला आहे. हवाई दलाने म्हटले आहे की, ही आकडेवारी हिंदुस्थानी हवाई दल किंवा संरक्षण मंत्रालयाने दिलेली नाही. सर्व 36 राफेल विमाने देशाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज आहेत. या वर्षी जून महिन्यात हवाई दलाने 36 राफेल विमानांच्या देखभालीसाठी निविदा मागविली होती. त्यातून हे सिद्ध होते की, सर्व 36 विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आहेत. विमान निक्रिय आहे म्हणून ते युद्धात नष्ट झाले असा होत नाही, असे हवाई दलाने स्पष्ट केले.
पाकिस्तानच्याही विमानांची संख्या घटली
‘फ्लाईट ग्लोबल’च्या अहवालानुसार पाकिस्तानच्याही सक्रिय विमानांची संख्या घटली आहे. पाकिस्तानच्या हवाई इशारा देणाऱया विमानांची संख्या नऊवरून सातवर आल्याचा या अहवालात उल्लेख आहे.




























































