
सामना प्रतिनिधी, पाथरी
तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबण्याची चिन्हं नाहीत. कर्ज मिळवण्यासाठी बँके समोर उपोषण करणारा शेतकरी हृदय विकाराने गुरुवारी मृत्यू पावल्याची घटना ताजी असतानाच काही तासाच्या अंतरात तालुक्यातील गोपेगाव येथील शेतकऱ्याने पाटोदा शिवारातील शेतातील घराच्या मागे पत्रात गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यांना परभणी येथे नेत असताना १४ डिसेंबर रोजी एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा वाटेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील शेतकरी बाबाराव खेडेकर (६२) यांचे पाटोदा शिवारात पावणे ९ एकर शेत असल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी ते कुटुंबासह राहातात. एसबीआय आणि वैद्यनाथ या बँकेचे त्यांच्याकडे कर्ज असून ते माफ झाले नाही. परत नापिकी अशा विवंचनेत असलेल्या बाबाराव खेडेकर यांनी गुरूवार, १३ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजता शेतातील घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या खोलीत विषारी औषध प्राशन केले.
याची माहिती मुलगा, जावई यांना कळताच त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी दवाखान्यात नेले. परंतु परभणी जवळ वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, तीन मुले, तीन मुली, वडील, जावई, नातवंडे, सुना असा परिवार आहे.































































