
सामना प्रतिनिधी । अमरावती
शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्यावर शुक्रवारी येथील हिंदू स्मशान भूमीत साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आला. संजय बंड यांचे पुत्र स्वराज यांनी आपल्या पित्याच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक हिंदू स्मशानभूमीवर उपस्थित होते. संजय बंड ‘अमर रहे’च्या घोषणेने आज अमरावती शहर शोकसागरात बुडाले.
शनिवारी १३ डिसेंबर रोजी ९.३०च्या दरम्यान संजय बंड यांचा दवाखान्यात मृत्यु झाला. आज सकाळी त्यांचा पार्थिव देह संजय बंड यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. संजय बंड यांच्या मृत्युची बातमी कळताच खासदार आनंदराव अडसुळ आज सकाळीच दिल्लीवरुन अमरावतीला पोहोचले. त्यानंतर पालकमंत्री प्रविण पोटे यांनीही बंड यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यासोबतच जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी अंत्यदर्शनासाठी संजय बंड यांच्या निवासस्थानी हजर होते. या सर्वांनी बंड कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर दुपारी संजय बंड यांची अंत्ययात्रा हिंदू स्मशानभूमीवर गेली. शहराच्या प्रमुख मार्गाने ही अंत्ययात्रा जात असताना संजय बंड अमर रहे… च्या घोषणा देण्यात आल्या. संजय बंड यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शहरातील नागरीक दुतर्फा रस्त्याने उभे होते. या सर्वांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रध्दांजली अर्पण केली.




























































