
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते, पण खासगी विकासकाने बांधलेले घर घेणे खिशाला झेपणारे नसते. मग अशावेळी एकच आसरा उरतो, तो म्हणजे ‘म्हाडा’च्या घरांचा. म्हाडाची यंदाची लॉटरी आज रविवारी फुटणार असून कुणाचे गृहस्वप्न पूर्ण होणार याचा फैसला होणार आहे. सामान्य मुंबईकरांपासून ते पत्रकार, कलाकार आणि राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच या घरांसाठी अर्ज केले आहेत. आज म्हाडा मुख्यालयात सकाळी 10 पासून या सोडतीला सुरुवात होईल.
यंदा 1 हजार 384 घरांसाठी तब्बल 1 लाख 64 हजार 458 अर्ज आले आहेत. मुलुंड, वडाळा, महावीरनगर, गोरेगाव येथील घरांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत कोटीमध्ये असून या गटात केवळ तीन घरे असून या घरांसाठी 136 अर्ज आले आहेत.
मराठी नाट्य-सिनेसृष्टीतल्या कलाकारांचेही अर्ज
मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यंदा म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केले आहेत. अभिनेत्री नीलम शिर्के, ‘तुला पाहते रे’ मालिकेमधील झेंडे ऊर्फ उमेश जगताप, गायिका मुग्धा वैशंपायन, नचिकेत देवस्थळी, सुशांत शेलार, ऋषिकेश जोशी, तेजपाल वाघ यांनी अर्ज केले आहेत.
पाच कोटींचे घर कुणाला?
ग्रॅण्ट रोड येथील तब्बल पाच कोटींचे घरही यंदा सोडतीचे आकर्षण ठरले आहे. हे घर कुणाला मिळणार, कोण नशीबवान ठरणार हे पाहण्याची उत्सुकताही आहे.
निकाल पाहण्यासाठी डिजिटल पडदे
निकाल पाहण्यासाठी मुख्यालयात डिजिटल पडदे लावण्यात येणार आहेत. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरही सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तर सायंकाळी 6 वाजल्यानंतर सोडतीचा सविस्तर निकाल जाहीर केला जाणार आहे.



























































