वन अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याचे वाचले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, इगतपुरी

सिन्नर-घोटी महामार्गावरील धामणगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अखेरचा श्वास घेणाऱया बिबटय़ाला वन खात्याच्या अधिकाऱयांमुळे जीवदान मिळाले आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास एका वाहनाने बिबटय़ाला धडक दिल्याची खबर मिळताच वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बिबट्याचा जीव वाचवला. योग्य वेळेत अत्यावश्यक उपचार मिळाल्याने बिबटय़ाचा जीव वाचला असल्याची माहिती टाकेद बुद्रुकच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे यांनी दिली.

घोटी-सिन्नर महामार्गावर धामणगावजवळ रात्रीच्या वेळी मुक्त संचार करणारा बिबटय़ा फिरत होता. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक अज्ञात वाहनाची धडक बिबटय़ाला बसली. यामध्ये तो मोठय़ा प्रमाणात रक्तबंबाळ झाला. महामार्गावर तो निपचित पडून अखेरचा श्वास घेत होता. या घटनेबाबत या भागाचे वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी माहिती समजली. त्यांनी तातडीने वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांचे मार्गदर्शन घेतले. वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्या मदतीने बिबट्याला स्वतःच्या वाहनात टाकले. पिंजऱ्याची वाट न पाहता तातडीने अत्यावश्यक उपचार करण्यासाठी टाकेद बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरू केले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री तळपाडे आणि वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी योग्य वेळेत उपचार सुरू केले. पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू असलेल्या उपचारांमुळे अखेरचा श्वास घेऊन मृत्युघंटेला लागणाऱया बिबटय़ाचा प्राण वाचला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे बिबटय़ाचा जीव वाचला आहे. उशीर झाला असता तर बिबट्या जागीच गतप्राण होण्याची अधिक शक्यता होती. सध्या अशोक स्तंभावरील पशुवैद्यकीय दवाखान्यात बिबटय़ावर पुढील उपचार सुरू आहेत.

धामणगाव भागातच यापूर्वी विहिरीत बिबटय़ा पडला होता. त्यातच मच्छरदाणीतील बालकांसोबतही बिबट्या जाऊन झोपल्याची घटना घडली होती. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव आणि त्यांच्या सहकाऱयांचे विशेष कौतुक केले आहे.

महामार्गावर बिबटय़ा अपघातात ठार झाल्याचे समजले होते, मात्र घटनास्थळी गेल्यावर बिबटय़ाचा अंगात धुगधुगी असल्याचे जाणवल्याने तत्काळ उपचाराचा निर्णय घेतला. बिबटय़ा वाचल्याचा आनंद वाटतो.
– गोरक्षनाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी