कचऱ्यातून प्लॅस्टिक वेगळे करून टेबल, खुर्च्या तयार करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत रोजच्या रोज मोठय़ा प्रमाणावर कचरा गोळा होतो. या कचऱ्यातून प्लॅस्टिक वेगळे केल्यास त्याचा चांगला वापर होऊ शकतो. प्लॅस्टिकपासून महापालिकेत कार्यालयीन वापरासाठी लागणाऱया टेबल, खुर्च्या आणि इतर वस्तू बनवता येतील अशी मागणी नगरसेवक अमेय घोले यांनी केली आहे.

प्लॅस्टिक पर्यावरणाला हानीकारक आहे.प्लॅस्टिकबंदीबद्दल समाजात जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. परंतु यातून प्लॅस्टिकबंदीचा प्रश्न सुटणार नाही. आजही मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक सर्वत्र उपलब्ध आहे. या प्लॅस्टिकपासून टेबल, खुर्ची, रायटिंग बोर्ड, कचऱ्याचे डबे, शाळेतील बेंचेस तसेच अनेक वस्तू बनवता येईल आणि प्लॅस्टिकचा योग्य वापर करता येतील असे मत अमेय घोले यांनी व्यक्त केले आहे.

कचऱ्यातून मोठय़ा प्रमाणावर प्लॅस्टिक उपलब्ध होईल. जर आपल्याकडे कच्चा माल मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असेल तर महापालिका स्वतःच्या खर्चावर आपल्या कार्यालयीन वापरातील तसेच महापालिकेच्या शाळांना लागणारे प्लॅस्टिकचे बेंचेस तसेच कचऱयाचे डबे स्वतः तयार करू शकेल. त्यामुळे पालिकेच्या वार्षिक खर्चात मोठय़ा प्रमाणावर बचत होऊ शकेल.