
सामना प्रतिनिधी । पारनेर
देशभरातील ग्रामीण डाक कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवा ठप्प होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष कॉ. एस. बी. लंके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
टि.आर.सी.एच.ए. चे फिक्सेशन दि. 1 जानेवारी 2016 पासून लागू करावे, फरकाचे मुल्यमापन कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशीनुसार करण्यात यावे, 12, 24, 26 वर्षे सेवा झालेल्या शिफारशींप्रमाणे वार्षिक वाढ देण्यात यावी, ग्रॅच्युईटी कमिटीच्या शिफारशीप्रमाणे 5 लाखांची शिफारस करावी, पेन्शन फंड टि.आर.सी.ए.च्या 10 टक्के कपात करण्यात यावा, कमिटीच्या शिफारशीप्रमाणे कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश काढावेत, स्वेच्छानिवृत्ती त्वरीत लागू करावी, कंबाईन डयुटी अलाउंस सुधारीत आर्डर काढून लागू कराव्यात, 30 दिवसांची रजा देण्यात यावी व 180 दिवस साठविण्यास मंजुरी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी संप पुकारला आहे.
मे 2017 मध्ये कर्मचा-यांनी 16 दिवसांचा बेमुदत संप केल्यानंतर शासनाने कॅबिनेटची बैठक बोलवून कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू केल्या. शिफारशी लागू करण्यात आल्या परंतू फायद्याचे आदेश मागे ठेवण्यात आले.
मिळणारा फरक सन 2016 पासून देण्यात न आल्याने कर्मचार्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागे ठेवण्यात आलेले आदेश लागू करण्यासाठी संघटनेने बरेच दिवस वाट पाहिली मात्र त्यात दिरंगाई होत आहे. दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत असताना त्याबदल्यात मोबदला मिळत नाही. आयोगाच्या माध्यमातून सर्वाचा फायदा होईल अशी अशा होती मात्र केंद्र सरकारने कर्मचार्यांची घोर निराशा केल्याचे या पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
या संपात कर्मचार्यांनी 100 टक्के प्रतिसाद देण्याचे अवाहन अध्यक्ष लंके यांच्यासह सचिव कॉ. एस. एस. परभाणे कार्याध्यक्ष कॉ. ए. एस. पवार, खजिनदार आदींनी केले आहे.
























































