मालवण पोलिसांवर हल्ला; पोलीस हवालदार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

वायरी येथील एका युवकावर दगडाने हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतर पोलिसांचे पथक माघारी फिरले आहे. ही घटना वायरी तानाजी नाका येथे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता घडली.

वायरी येथील तेजस लुडबे हा युवक तानाजी नाक्यावरून घरी जात होता. त्याचवेळी एका तरुणाने कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तेजस याने जाब विचारला असता हल्लेखोरांने तेजसच्या दिशेने दगड फेकला. त्यात तेजसच्या चेहऱ्याला जबर मार बसला. त्याला ग्रामस्थांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तेजस याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तेजसच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी पोलीस हवालदार सुलील वेंगुर्लेकर, सुनील पवार व हर्षल खडपकर यांचे पथक पाठवले. पोलिसांचे पथक वायरी येथील संशयित हल्लेखोरांच्या घराकडे पोहचले. दरवाजा वाजवल्यानंतर दोन तरुण घराबाहेर आले. त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. यावेळी त्यातील एकाने घरात ठेवलेले दगड पोलिसांच्या दिशेने भिरकवण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्यांने लोखंडी शिगेने पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांच्यावर हल्ला केला. त्यात वेंगुर्लेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

हल्लेखोरांनी घरातून हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. तेजसच्या तक्रारीवरून संशयितांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांची पळापळ झाल्याने संशयितांना ताब्यात न घेताच माघारी परतावे लागले. या मनोरुग्ण हल्लेखोरांनी यापूर्वीही नोटीस बजावण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.