
सामना ऑनलाईन, मुंबई
लैंगिक शोषणातून वाचलेले पाच हजार शोषित जनजागृतीसाठी उद्यापासून डिग्निटी मार्च काढणार आहेत. मुंबईतून या उपक्रमाची सुरुवात होणार असून देशभरातील 24 राज्यांतील 200 जिह्यांमधून दहा हजार किलोमीटर अंतर पार करून लैंगिक हिंसाचाराबद्दल वृत्ती बदलण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. ‘गरिमा अभियानां’तर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लैंगिक शोषणाचे बळी पडलेल्यांना समाजाच्या अवहेलनेचा सामना करावा लागतो, मात्र आरोपींना कठोर शिक्षा होत नाही. या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलांविरोधातील लैंगिक शोषणाविरोधात ही 65 दिवसांची राष्ट्रीय मोहीम राबवली जात आहे. लैंगिक शोषण आणि अत्याचाराविरोधात लढण्यासाठी कायदे, नियम यांची माहितीही यामध्ये दिली जाणार आहे. ‘गरिमा अभियान’ संस्थेने केलेल्या ‘स्पीक आऊट’ सर्वेक्षणातून ही संकल्पना उदयास आली आहे. यामध्ये लैंगिक शोषितांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे 95 टक्के लैंगिक शोषणाच्या अत्याचारांची नोंदच झाली नसल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. तक्रार केल्यास समाजात बदनामी होण्याची शोषितांना भीती असते. फक्त दोन टक्के गुह्यांचीच पोलिसांत तक्रार करण्यात येते. या पार्श्वभूमीवर समाजात लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गरिमा अभियानाचे आसिफ शेख यांनी दिली. हा डिग्निटी मार्च 22 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्लीत थांबणार आहे. या अभियानाला पाठिंबा देण्यासाठी 7822001155 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रत्येक 15व्या मिनिटाला एका मुलाचे लैंगिक शोषण
महिला आणि मुलांचे लैंगिक शोषण होण्याचे प्रमाण वाढतच आहे. ‘एनसीआरबी’च्या सर्वेक्षणानुसार 2007 मध्ये महिलांविरोधात 185312 गुह्यांची नोंद झाली होती. मात्र 2016 मध्ये यात 83 टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा 3,38,954 वर गेला आहे. दशकभरात महिलांविरोधात तब्बल 2.5 दशलक्ष गुह्यांची नोंद झाली आहे. 2016 मध्ये दररोज 106 बलात्कार झाले आहेत. लैंगिक अत्याचाराला लहान मुले सहज बळी पडत असल्याचेही समोर आले आहे. देशात प्रत्येक 15 व्या मिनिटाला एक मूल लैंगिक शोषणाला बळी पडते. 2016 मध्ये सुमारे 24 हजार मुले आणि महिला मानवी तस्करीच्या गुह्यांना बळी पडल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.



























































