
सामना प्रतिनिधी । मुंबई
देवनार डंपिंग ग्राऊंडला लागून उभ्या राहिलेल्या तब्बल 127 झोपड्या पालिकेच्या एम पूर्व विभागाने धडक कारवाई करून हटवल्या आहेत. अत्यंत संवेदनशील अशा या भागात पालिकेने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई पार पाडली. डंपिंग ग्राऊंडच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
देवनार डंपिंग ग्राऊंडवर घुसून काही समाजकंटक आग लावतात तसेच कचऱ्यातून मिळणाऱ्या वस्तूंसाठी अनेकदा टोळ्यांमध्ये हाणामाऱ्याही होतात. हे प्रकार थांबवण्यासाठी महापालिकेने देवनार क्षेपणभूमीच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या भिंतीच्या बांधकामात 127 अनधिकृत झोपड्या अडथळा ठरत होत्या. या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या, अशी माहिती ‘एम पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. या कारवाईदरम्यान शिवाजीनगर, गोवंडी परिसरातील आदर्शनगर नाल्याजवळ उद्भवलेल्या अनधिकृत 127 झोपड्या आता हटविण्यात आल्या आहेत.





























































