रविवारी बसवेश्वररत्न, जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कोकण वीरशैव लिंगायत समाज, मुंबईचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू असून, यानिमित्त ‘वीरोत्सव 2018’ चे रविवार दि. 23 डिसेंबर रोजी प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे होणार आहे.

यावेळी बसवेश्वररत्न आणि जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण होणार आहे अशी माहिती कोकण वीरशैव लिंगायत समाजचे उपाध्यक्ष संतोष मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेला संस्थेचे सहसचिव प्रमोद लिंगायत, सल्लागार रवींद्र वीरकर, अभिजीत गुरव उपस्थित होते. दि.२३ रोजी सकाळी 8.00 वा. मारुती मंदिर ते प्रमोद महाजन क्रीडा संकूल अशी शोभायात्रा काढण्यात येणार असून, यामध्ये डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी (काशी) यांचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. त्यानंतर श्रीमद् जगद‍्गुरू आर्शीवचन व दर्शन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, माजी मंत्री विनयराव कोरे, म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत, आ. भरत गोगावले, नगराध्यक्ष राहुल पंडित उपस्थित राहणार आहे. दुपारी 1.00 वा. महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

दुपार सत्रात 3.00 वा. वीरशैव साहित्य अभ्यासक डॉ. शेषनारायण देवाप्पा पसारकर यांचे वीरशैव धर्म-आचार-विचार आणि संस्कृती यावर चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी 4 वा. वीरशैव साहित्य अभ्यासक प्रा. डॉ. श्यामा घोणसे यांचे महिला सबलीकरणवर मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी 6 वा. सत्कार समारंभ अणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महाड येथील माधव कुरधंडकर यांना बसवेश्वररत्न पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच रवींद्र गुरव, दत्ताराम लिंगायत, वृषाली लिंगायत, पूर्वा गुरव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे.

त्याचबरोबर विशेष मार्गदर्शनपर दालनात मोटीव्हेशनल गुरू डॉ. संतोष कामेरकर यांचे शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन, कृषी विद्यापीठ दापोलीतील कृषीशास्त्रज्ञ डॉ. संतोष वरवडेकर कृषीविषयक मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती 2 फोटो व बायोडाटा सोबत आणणे आवश्यक आहे.

वीरोत्सव कार्यक्रमात कोकणातील विविध संस्था व मंडळे सहभागी होणार आहेत. यामध्ये वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष संतोष मांजरेकर यांनी केले.