पशुधनाचाही आता उतरविता येणार विमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पशुधन विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० हजार पशुधन घटकाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील गाई, म्हशी, घोडा, शेळी, मेंढी या जनावरांचा विमा उतरवण्यात येणार आहे.

जिल्ह्यासह राज्यात दररोज विविध आजार किंवा अपघातात जनावरे मृत्युमुखी पडतात; परंतु जनावरांचा विमा नसल्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीत पशुपालकांना हातभार लागावा, जनावरांचे नुकसान भरून मिळावे, यासाठी `पशुधन विमा योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण घटकांसाठी ४० हजार, तर विशेष घटकांसाठी १० हजार पशुधन घटकाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शेळी, मेंढी, गाई, म्हशी, शेळी, ससा, डुक्कर, घोडा, गाढव, उंट या प्राण्यांचा विमा काढण्यात येणार आहे. एक वर्षासाठी २.९५, तर तीन वर्षांसाठी ७.५० रुपये प्रीमियम असणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र शासनाने निश्चित केलेल्या भौतिक उद्दिष्टानुसार प्राथमिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात दीड हजार पशुधन घटक याप्रमाणे राज्यातील पशूंचा विमा उतरविण्यात यावा, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात ही योजना राबविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.