वेदांतनगरमध्ये श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर येथील वेदांतनगरमधील श्रीदत्तक्षेत्रात भगवान दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळा शुक्रवारी दि. २१ डिसेंबरला दुपारी १२ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र गाणगापुर येथील प्रथेप्रमाणे हा सोहळा संपन्न झाला.

श्री दत्तात्रेय जन्मोत्सवासाठी श्रीदत्तक्षेत्र परिसर केळीच्या खुंटांनी, आंब्याच्या पानांच्या तोरणांनी, विविधरंगी फुलांनी व विद्युत दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते. भगवान श्री दत्तात्रेय मंदिराचे गर्भगृह व प.पू.सद्गुरूंचे अधिष्ठान सुरेख सजवले होते. कल्पवृक्षासभोवतीही लक्षवेधी सजावट करण्यात आली होती.

सकाळी ११•३०च्या सुमारास वेदमंत्रोच्चारात भगवान दत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्यास शुभारंभ झाला. श्रीदत्तात्रेयांची बालमूर्ती फुलांनी सजविलेल्या पाळण्यामध्ये विराजमान करण्यात आली होती. दुपारी १२ वाजता पाळणा हलवून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. स्थानिक महिला सत्संग मंडळाने गायनसेवा केली.

दुपारी ४ ते ५•३० या वेळेत प.पू.सद् गुरूंच्या अधिष्ठान मंडपात पाद्यपूजा सोहळा विधीवत पार पडला. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या २३ सत्संग मंडळाचे पदाधिकारी या पाद्यपूजा सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. देवस्थानचे सचिव श्री.संजय क्षीरसागर, विश्वस्त सर्वश्री. मोहन शुक्ल, नितीन जोगळेकर, दिनेश पटवर्धन, देवराज काशीकर, राजन जोशी व सुधीर माळी यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. देवस्थानने श्रीदत्तात्रेय जयंतीला वैदिकांचा सन्मान करण्याची प्रथा प.पू.गुरूदेवांच्या आज्ञेनुसार जतन केली आहे. देवस्थानमधील वेदांत विद्यापीठाच्या प्रातिशाख्यसहित षडंगयुक्त घनपाठ या सर्वोच्च परिक्षेत प्राविण्य मिळवलेल्या पुणे येथील वेदमूर्ती स्वानंद शिवराम धायगुडे यांना विद्यापीठाचे प्रधानाचार्य वेदमूर्ती समिहन कोल्हटकर यांच्या हस्ते महावस्त्र, श्रीफळ व दक्षिणा देऊन गौरविण्यात आले.

देवस्थानचे विश्वस्त मोहन शुक्ल यावेळी बोलताना म्हणाले, आपल्या देवस्थानच्या वेदांत विद्यापीठात हिंदुस्थानातील विव्दान एकत्र येऊन एकाच बैठकीत शास्त्रशाखेच्या परिक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्याची इतिहास घडवणारी घटना घडली आहे. सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी ही घटना विद्यापीठाचे कार्य जागतिक दर्जाचे आहे, हे अधोरेखित करणारीच आहे. सद् गुरूंच्या अस्तित्वाच्या या अलौकिक पाऊलखुणाच असून आपणा सर्वांना असे सद् गुरू लाभले, हे आपले भाग्यच होय. पाद्यपूजा सोहळ्याचे सूत्रसंचालन बालूभाई गांधी यांनी केले.

त्यानंतर सायंकाळी ७ ते ९ यावेळेत सामुदायिक महाआरती व पालखी सोहळा झाला. पालखी मार्गावर रांगोळीच्या व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पालखी प्रदक्षिणा सुरू असताना वेदांत विद्यापीठातील विद्यार्थी उच्चस्वरात वेदपठण करत होते.भाविकांकडून सवाद्य गायनसेवा करण्यात येत होती. उपस्थित सर्व स्त्री-पुरूष भक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. दिवसभर भाविकांनी दर्शनाचा आनंद घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. देवस्थानने भाविकांच्या दर्शनरांगेची विशेष व्यवस्था केली होती. अत्यंत शिस्तबध्दरित्या येथील श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. देवस्थानचे व्यवस्थापक श्री.त्र्यंबक वैकर व कर्मचारी वृदांनी विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. शनिवारी दि. २२ डिसेंबरला पारणा सोहळ्याने या उत्सवाची सांगता होणार आहे.