
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याच्या कामासाठी तब्बल 5.7 अब्ज डॉलरच्या (सुमारे 40 हजार कोटी) निधीला अमेरिकन काँग्रेसने मंजुरी दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी खर्चासाठीच्या तरतुदींच्या बजेटवर स्वाक्षरी केली नाही. यामुळे अमेरिकेत शटडाऊन झाले असून गृह, कृषी, परिवहन, न्यायसह अनेक विभागांतील तब्बल आठ लाख कर्मचाऱयांना बिनपगारी सक्तीच्या सुट्टीवर जावे लागले. ख्रिसमसपूर्वीच अमेरिकेत हा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे.
मेक्सिको नागरिकांना रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमेवर मजबूत भिंत बांधण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिले होते. राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सातत्याने ट्रम्प हा मुद्दा मांडत आहेत, परंतु डेमोक्रॅटिक पक्षाचा अशी भिंत उभारण्यास विरोध आहे. शुक्रवारी मध्यरात्री बारापर्यंत निधीबाबत चर्चा सुरू होती. अखेर निधीचा प्रस्ताव मंजूर न होताच अमेरिकन काँग्रेसचे कामकाज स्थगित केले गेले.
प्राणिसंग्रहालये, उद्यानेही बंद राहणार
– शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अनेक विभागांचे कामकाज शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच ठप्प होण्यास सुरुवात झाली आहे. प्राणिसंग्रहालये, उद्यानेही बंद झाली आहेत. अनेक पर्यटनस्थळेही बंद ठेवली आहेत.
– ‘नासा’चेही कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत.
– ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तीन महिन्यांतील दुसरे शटडाऊन आहे. ख्रिसमस सणापूर्वीच शटडाऊन झाल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पगारच नसल्याने कर्मचाऱयांची आर्थिक कोंडी झाली आहे.
बिनपगारी काम करा किंवा घरी बसा!
अमेरिका-मॅक्सिको सीमेवर संरक्षक भिंत उभारण्यासाठी तब्बल 5.7 अब्ज डॉलर्स (सुमारे 40 हजार कोटी) खर्च येणार आहे. या निधीच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे संतापलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सरकारी खर्चासाठीच्या तरतुदी असलेल्या बजेटवर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे कर्मचाऱयांच्या पगारासाठीचा निधी रोखला गेला. याचा फटका तत्काळ अमेरिकन सरकारच्या 8 लाख कर्मचाऱयांना बसला आहे. बिनपगारी काम करा किंवा घरी बसा असा हा निर्णय आहे. त्यामुळे बहुतांशी कर्मचारी बिनपगारी सुट्टीवर गेले आहेत.























































