हजारो पर्यटक रस्त्यात अडकले, मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पेण

चौथा शनिवार, रविवार त्यानंतर मधे सोमवारी एक दांडी आणि लगेच मंगळवारी ख्रिसमस हॉलिडे.. अशा चार सुट्टय़ांचा बेत आखून कोकणात मौजमजेसाठी निघालेल्या हजारो पर्यटकांचे आज रस्त्यातच ‘हॅपी ख्रिसमस’ झाले. लटकलेले चौपदरीकरणाचे काम व बेशिस्त वाहनचालकांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी 9 वाजल्यापासून पेण ते वडखळ दरम्यान प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. तब्बल पाच किलोमीटरच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या असून पर्यटकांना एकाच ठिकाणी जवळपास चार तास लटकून राहावे लागल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

नाताळ 25 तारखेला असला तरी त्यापूर्वी चौथा शनिवार आणि रविवार आल्याने अनेकांनी आपल्या गाडय़ा बाहेर काढून मित्रमंडळी आणि कुटुंबकबिल्यासह ख्रिसमस एन्जॉय करण्यासाठी कोकणची वाट धरली. अलिबाग, मुरुड जंजिरा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, कणकवली, वेंगुर्ल्याचे हॉट डेस्टिनेशन असलेल्या समुद्रकिनारी नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र अवजड वाहतूक बंद करूनही आज मुंबई-गोवा महामार्ग अनेक ठिकाणी वाहतूककोंडीने जाम झाला. चौपदरीकरणाचे संथ गतीने सुरू असलेले काम आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे जिते, पेण, वडखळ, आमटेम, हमरापूर त्याचबरोबर अलिबाग मार्गावर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेण-वडखळ या पाच मिनिटांच्या अंतराला तब्बल चार तास लागत होते. त्यामुळे प्रवाशांना अक्षरशः नकोसे झाले.

पोलिसांची पळापळ
महामार्गावर दुभाजक नसल्याने पोलिसांची पाठ फिरताच काही वाहनचालक आपल्या गाडय़ा चुकीच्या पद्धतीने मधे घुसवत होते. एकीकडे ट्रफिक सुरळीत झाली की दुसऱया ठिकाणी पुन्हा वाहतूककोंडी होत होती. त्यामुळे पोलिसांची वाहतूककोंडी सोडवताना अक्षरशः पळापळ झाली.