
सामना ऑनलाईन, हिंगोली
भाजप आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला दारू पिऊन आले काय ? असा प्रश्न विचारल्याने या दोघांमध्ये जबरदस्त शाब्दीक भडका उडाला आहे. तानाजी मुटकुळे आणि रामराव वडकुते अशी या आमदारांची नावे आहेत. भाजपचे आमदार असलेल्या मुटकुळे यांनी वडकुते यांना दारू पिऊन आला आहेत का असं वाक्य उच्चारल्यानंतर वडकुतेंनी त्यांना तोंड सांभाळून बोला असं म्हणत झापलं.
वाद नेमका काय आहे ?
हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी टंचाई आढावा बैठकी घेतली. या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींना न बोलावल्याने वडकुते संतापले होते. पालकमंत्री फोन उचलत नसल्याने वडकुते यांनी भाजप आमदार मुटकुळे यांना फोन लावला. कोतवालांसंदर्भातील प्रश्न वडकुतेंनी मुटकुळेंकडे उपस्थित केला. यावर मुटकुळे यांनी तुमच्या वेळेला कोतवाल नव्हते का असा प्रतिप्रश्न केला. यामुळे वडकुते संतापले आणि त्यांनी आम्ही काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही चार वर्षात काय केलं हे सांगा असं संतापलेल्या सुरात ऐकवलं. यावर मुटकुळे यांनी ‘दारू पिऊन आला आहात का ?’ असा त्यांना उलटा प्रश्न विचारला. वडकुते यांनी हा प्रकार पत्रकारांना सांगितला, मात्र मुटकुळे यांनी आमदार वडकुते यांचा हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हटलं आहे.




























































