
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा भागातल्या एका खुल्या जागेमध्ये नमाज पढण्यास मनाई करण्यात आली आहे. सेक्टर 58 मध्ये ही खुली जागा असून स्थानिकांनी इथे नमाज पढण्यास विरोध केला होता. या खुल्या भागाचा वापर कोणत्याही धार्मिक विधींसाठी करण्यास मनाई असल्याने इथे नमाज पढता येणार नाही असं स्थानिक पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
सुरुवातीला या मैदानामध्ये दर शुक्रवारी 15-20 मुसलमान नमाज पढायचे. हळूहळू ही संख्या वाढत गेली आणि ती 200 पर्यंत पोहोचली होती. या खुल्या जागेमध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. मुसलमानांनी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे या जागेत नमाज पढण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र दंडाधिकाऱ्यांनी त्याला नकार दिला होता. या मोकळ्या जागेच्या आसपास ज्या कंपन्या आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांना नमाज पढता यावा यासाठी त्यांनी सोय करावी कारण या खुल्या जागेचा वापर नमाजासाठी करता येणार नाही. मोकळ्या जागेत नमाज पढण्याला हरियाणातील गुरुग्राममध्ये सर्वात पहिल्यांदा विरोध झाला होता. यानंतर स्थानिक प्रशासनाने ठराविक जागा सोडल्यास मुसलमानांना इतर कुठेही नमाज पढता येणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं.


























































