
आशिष बनसोडे, मुंबई
नाताळनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून घरोघरी चॉकलेट, केक असे विविध खाद्यपदार्थ बनविण्याची रेलचेल सुरू आहे. मुंबई विभागातील कारागृहदेखील यात मागे नाही. सध्या कारागृहांमध्येदेखील नाताळ फिव्हर जोरात आहे. दिवाळी, ईदप्रमाणे कारागृहांमध्येदेखील नाताळ सण साजरा करण्यात येत असून कैद्यांसाठी खास केकचा बेत आखण्यात आला आहे. ठाणे कारागृहात हजारो कप व स्पंज केक बनवून ते इतर कारागृहात पाठविण्यात आले आहेत.
खिसमसमध्ये केकला चांगली मागणी असते. या सणात केकवर जबरदस्त ताव मारला जातो. म्हणूनच कारागृहात देखील ख्रिसमस निमित्त कैद्यांना केकची मेजवानी देण्यात येत आहे. कारागृहात इतर देशांचे देखील कैदी आहेत. त्यांच्याबरोबर आपल्या देशातील कैद्यांना आनंदाचा सण असलेला नाताळ साजरा करता यावा. त्यानिमित्ताने त्यांना वेगळे वातावरण अनुभवता यावे असा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच आम्ही इतर सणांप्रमाणे ख्रिसमस देखील कारागृहात साजरा करतो. त्यामुळे सर्वच कैद्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या वतीने प्रत्येक कैद्याला केक दिला जातो. यावर्षी देखील पाच कारागृहातील कैद्यांसाठी त्यांच्या मागणीनुसार हजारो केक बनवून देण्यात आल्याचे ठाणे कारागृहाचे अधिक्षक नितीन वायचल यांनी सांगितले.
कारागृहाचे नाव कप केक स्पंज केक रुपये
आर्थर रोड कारागृह 8500 525 1,45,163
तळोजा कारागृह 6068 384 1,05,000
ठाणे कारागृह 8260 494 1,38,516
भायखळा कारागृह 759 55 14,252
कल्याण कारागृह 5192 301 85,569
इतर संस्था 420 55 2,663
– यंदा आर्थर रोड कारागृहातून सर्वाधिक जवळपास दीड लाखाचे केक बनवून देण्यात आले.
– कैद्यांच्या मनीऑर्डरमधील पैशांतूनच त्यांना केक दिला जातो.
– कुठल्याही कैद्याला केक कमी पडणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.
– 1 कप केकची किंमत 7 रुपये तर 1 किलो स्पंजकेकची किंमत 150 रुपये.
न्युट्रिशियनच्या मार्गदर्शनानुसार केक
प्रसिद्ध न्युट्रिशियन निशा नायक यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली कैद्यांसाठी खुसखुशीत व चवदार कप व स्पंज केक बनविण्यात आले आहेत. प्रत्येक कैद्याला केक मिळेल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
ठाणे कारागृहात केकचा घमघमाट
ठाणे मध्यवर्ती कारागृहात केवळ केक बनविण्याची भट्टी आहे. त्यामुळे पाच कारागृह तसेच इतर संस्थांकडून आलेल्या मागणी नुसार त्याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून 13 कैदी केक बनविण्यात गुंतले आहेत. केक बनविण्यात माहिर असलेल्या कैद्याला 61 रुपये, त्याला मदत करणाऱया कैद्याला 54 रुपये तर केक बनविण्याचे ट्रेनिंग घेणाऱ्या कैद्याला 44 रुपये भत्ता दिला जात आहे.































































