
सामना प्रतिनिधी । अलिबाग
ज्याची समुद्रावर सत्ता त्याची जमिनीवर सत्ता या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून कोकण किनारपट्टीवर जलदुर्ग किल्ले बांधले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुरुडमधील समुद्रात कासा खडकावर पद्मदुर्ग किल्ला जंजिरा किल्ला हस्तगत करण्यासाठी बांधला होता. मात्र सध्या या पद्मदुर्ग किल्याचे ढासळते बुरुज पाहून शिवाजी महाराजांनी बांधलेले हे वैभव लयास जात आहे. पद्मदुर्ग किल्याच्या या अवस्थेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून शासनाने किल्याच्या जतन व संरक्षणासाठी पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा, खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग, रत्नदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यासारखे जलदुर्ग बांधले आहेत. या जलदुर्गामुळे महाराजांनी पाण्यावर आपली सत्ता काबीज करून स्वराज्य निर्माण केले. जंजिरा किल्ला हस्तगत करण्यासाठी त्याच्या समोर भर समुद्रात कासा खडकावर शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग किल्ला उभा केला. या किल्यावर चोहोबाजूने 54 तोफा लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शत्रूला रोखण्यासाठी या तोफा काम करीत होत्या.
पद्मदुर्ग किल्यात मावळ्यांना राहण्यासाठी, पिण्यासाठी सुविधा त्याकाळात करण्यात आली होती. किल्ल्याला मजबूत अशी तटबंदी केली होती. मात्र आज या किल्याचे वैभव लयास जात असून तटबंदीचे बुरुज ढासळले आहेत. किल्याचा आतील भागही कोसळला आहे. पद्मदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ला आहे. मात्र शासनाने हा किल्ला पर्यटकांपासून दुर्लक्षित ठेवला आहे. 24 व 25 डिसेंबर रोजीच या किल्यात पद्मदुर्ग जागर कार्यक्रमावेळी पर्यटकांसाठी व शिवभक्तांसाठी खुला केला जातो.
पद्मदुर्ग किल्याची अवस्था दयनीय झाली होती. या किल्याचे संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी पुरातन विभागाची असताना त्याचे या बाबीकडे दुर्लक्ष झालेले आहे. यासाठी कोकण कडा मित्र मंडळा मार्फत 10 वर्षांपासून या किल्यात स्वच्छता मोहीम व जागर करून किल्याचे जतन व संरक्षण केले जात आहे.
किल्यात येणाऱ्या पर्यटकाला मुरुड समुद्र किनाऱ्यावरून बोटीची सुविधा असली तरी किल्ल्याजवळ जेट्टी नसल्याने पर्यटकांना खडकावर आपला जीव मुठीत घेऊन उतरावे लागत आहे. त्याचबरोबर किल्यात कोणतीही पिण्याच्या पाण्याची वा स्वच्छता गृहाची सुविधा नाही. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाला पाणी व खाण्याची सोय घेऊनच यावे लागते. हा किल्ला पद्मदुर्ग जागर या दोन दिवसासाठीच पुरातन विभागाकडून खुला केलेला असतो. त्यामुळे अनेक येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांना या किल्याबाबत कोणतीच माहिती नाही. त्यामुळे हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करावा अशी मागणी शिवभक्त व पर्यटकांकडून होत आहे.
एकीकडे शासन छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करण्यासाठी हजारो कोटी खर्च करीत आहेत. मात्र शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग व किल्ले हीच खरी महाराजांची स्मारके असून यांचे जतन व संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच पद्मदुर्ग किल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे असे शिवभक्तांना वाटत आहे.
किल्यात आंबट शौकिन व मद्यपीचा राबता
पद्मदुर्ग किल्ला हा इतिहासाची साक्ष देणारा किल्ला असताना आजही दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या किल्यात आंबट शौकिन व मद्यपीचा अड्डा झाला आहे. किल्यात स्वच्छता करताना शिवभक्तांना बियर, व्हिस्कीच्या बॉटल मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. या अशा गोष्टीकडे पुरातत्व विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.
























































