
सामना प्रतिनिधी । बीड
ज्येष्ठ समाजसेवक, श्रमर्षी बाबा आमटे यांच्या जयंतीदिनी शिरुर तालुक्याला पाणी अभियानच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प बुधवारी शांतिवन प्रकल्पात आयोजित ‘पाणी अभियानच्या बैठकीत उपस्थित नागरिकांनी केला.
सातत्याने दुष्काळी परिस्थितचा सामना करावा लागणाऱ्या शिरुर तालुक्याला दुष्ळाळमुक्त करण्यासाठी शांतिवन सामाजिक प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. पाणी अभियानच्या माध्यमातून तालुक्यांतील गावांमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. गावांच्या सहभागासाठी बुधवारी शांतिवन प्रकल्पात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिरुरचे उपनगराध्यक्ष प्रकाश देसर्डा होते तर व्यासपीठावर शांतिवनचे दीपक नागरगोजे, रामदास हंगे, सुरेश उगलमुगले, संदीप ढाकणे, भरत खरमाटे, शाहुराव भोसले, विठ्ठल वनवे, गणपत पवळ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक दीपक नागरगोजे यांनी केले. तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा होत असलेला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिणाम सांगतानाच ही परिस्थिती बदलण्यासाठी जलसंधारणाची आवश्यकता त्यांनी सांगितली. केवळ शासनाच्या मदतीच्या अपेक्षेवर बसण्याऐवजी ग्रामस्थांनी एकजूट करुन जलसंधारणासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीच शांतिवन पाणी अभियानच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या मदतीने तालुक्यात यंदा जलसंधारणाची कामे करणार आहे. यात जास्तित जास्त गावांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी संदीप ढाकणे, रामदास हंगे, सुरेश उगलमुगले, प्राकश देसर्डा यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन सेवाश्रम प्रकल्पाचे सुरेश राजहंस यांनी केले.
































































