
बाळ तोरसकर,[email protected]
हॉकी हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय खेळ आहे. नुकताच हिंदुस्थानात हॉकीचा कुंभमेळा पार पडला. 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कलावधीत आपल्या हिंदुस्थान भूमीतील भुवनेश्वर येथील कालिंगा क्रीडांगणावर विश्वचषक हॉकीचा हा महामेळा पार पडला. खरतर हॉकीत असलेला आपल्या देशाचा दबदबा पाहता या विश्वचषकावर आपलेच नाव कोरले जायला हवे होते. एकेकाळी हिंदुस्थानाने हॉकीत सुवर्णकाळ पाहिला व गाजवला होता. हॉकी म्हटलं की लगेच एक नाव समोर येते ते म्हणजे मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद हे हॉकीतले जादूगर होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खरं तर हिंदुस्थानात हॉकी हा खेळ मेजर ध्यानचंद यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. एकदा का चेंडू हॉकीस्टिकला लागला की तो प्रतिस्पर्ध्याला मिळवणे म्हणजे महाकठीण काम. जसा काही चेंडू चुंबकाप्रमाणे त्यांच्या हॉकीस्टिकला चिकटून राहायचा व हॉकीतील विजय निश्चित व्हायचा. या महान खेळाडूचा जन्म उत्तर प्रदेश येथील अलाहाबाद येथे 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला. हॉकीतील त्यांच्या कामगिरीला मुजरा म्हणून हिंदुस्थान क्रीडा क्षेत्रात त्यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा होतो.
आताच्या पिढीतील मुलांना मात्र कोण आहेत हे मेजर ध्यानचंद सिंग असाच प्रश्न पडत असेल. एकदम सोपं उत्तर म्हणजे हॉकीसारख्या सांघिक खेळातसुध्दा ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400 पेक्षा जास्त व प्रथम दर्जाच्या सामन्यात 1000 पेक्षा जास्त गोल ज्यांनी केले ते म्हणजे मेजर ध्यानचंद! मेजर ध्यानचंद यांचे वडील सैन्यात होते. त्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे पहिल्या सहा वर्षांतच काय ते त्यांचे शिक्षण होऊ शकले नाही. मेजर ध्यानचंद वयाच्या सोळाव्या वर्षी सैन्यात ‘दिल्ली ब्राह्मण रेजिमेंट’मध्ये दाखल झाले. तोपर्यंत त्यांचा आवडता खेळ म्हणजे कुस्ती व तोच खेळ ते खेळतही होते. सैन्यात दाखल होईपर्यंत हॉकी हा खेळसुद्धा त्यांना माहीत नव्हता. ज्यावेळी आर्मी रेजिमेंटमध्ये त्यांनी सहज म्हणून हॉकी सामन्यात भाग घेतला त्या वेळी त्यांनी केलेला खेळ व ड्रिबलिंगवरील कौशल्य पाहता त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय केला. त्यामुळेच त्यांच्या प्रशिक्षकांनी मेजर ध्यानचंद यांच्याकडून हॉकीचे तंत्र व कौशल्य घोटवून घेतले. त्यामुळेच 1922 ते 26 या काळात रेजिमेंटच्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या कौशल्याची मोहर उमटवली व हॉकीचा पाया रचला.
त्यांनी विविध स्पर्धांमध्ये केलेल्या असामान्य कर्तृत्वामुळेच न्यूझीलंड दौऱयावर जाणाऱया इंडियन आर्मी संघात त्याची निवड झाली. या दौऱयात त्यांनी आपलं कौशल्य पणाला लावून आपल्या संघाला विजय मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलला. सेंटर फॉरवर्ड म्हणून खेळणारे ध्यानचंद हे नेहमीच आपल्या असामान्य खेळामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांच्या खेळाने सर्वच लोकांना भुरळ घातली गेली व ऑलिंपिकचा जादूगार होण्यासाठी त्यांना संधी मिळाली. ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वी झालेल्या न्यूझीलंड दौऱयात त्यांनी केलेल्या असामान्य कर्तृत्वामुळे ऑलिंपिकच्या हिंदुस्थानी संघात त्यांची निवड होण्यास ते पात्र ठरले. या न्यूझीलंड दौऱयात 21 पैकी 18 सामन्यांमध्ये हिंदुस्थानच्या सैन्यदलाने विजय मिळवले. खरं तर खडतर मैदान, पंचांचे पक्षपाती निर्णयावरून झालेल्या गदारोळ यामुळे हे सामने गाजले. तरीदेखील यावर मात करत तब्बल अठरा सामन्यात हिंदुस्थानच्या सैन्यदलाने विजय मिळवून दिले. विजयाचे शिल्पकार होते मेजर ध्यानचंद.
अॅमस्टरडॅम येथे 1928 मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये प्रथमच हॉकीचा समावेश करण्यात आला व विविध देशांना हरवत पहिले सुवर्णपदक हिंदुस्थान संघाने मिळवले. 1928 मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये हिंदुस्थानी संघाने अंतिम फेरीत नेदरलँडवर 3-0 असा विजय मिळवत पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवलं. यानंतर 1932 साली झालेल्या ऑलिंपिकमध्ये हिंदुस्थानने अपराजित राहत अंतिम फेरीत अमेरिकेवर 24-1 असा मोठा विजय मिळवून पुन्हा एकदा ऑलिंपिकमधील सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर 1936 च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये हिंदुस्थानी संघाने यजमान जर्मनीविरुद्ध 8-1 असा विजय मिळवत सुवर्णपदकाची हॅटट्रिक साजरी केली या तीन ऑलिंपिकमधील बारा लढतींमध्ये ध्यानचंद यांनी तब्बल 33 गोल केले होते.
1936 च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये यजमान जर्मनीला हरवल्यानंतर बक्षीस वितरणाला हिटलर उपस्थित होते. यावेळी ध्यानचंदच्या खेळाने मोहित झालेल्या हिटलरने ध्यानचंद यांना तू जर्मनीत ये. मी तुला जर्मनीचे नागरिकत्व व सैन्यात कर्नल पद देतो असं त्यांना सांगितले. मात्र ध्यानचंद यांनी नम्रपणे ही ऑफर धुडकावत त्यांना नाही सांगिताना पंजाब रेजिमेंटवर मला गर्व आहे आणि हिंदुस्थानचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. अशा या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. याशिवाय 2002 पासून सर्व खेळांतील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार म्हणून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. अशा या महान खेळाडूचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. असा हा महान खेळाडू 3 डिसेंबर 1979 रोजी कॅन्सरशी लढताना दिल्लीतील एम्स रुग्णालयात काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा अंतिम संस्कार स्मशानभूमीत न करता झाशीतल्या हॉकी मैदानावर करण्यात आला, जेथे ते तासन्तास हॉकीचा सराव करायचे. असं असलं तरी या महान खेळाडूला अजूनही ‘भारतरत्न’ या सन्मानापासून वंचित राहावे लागले आहे.

























































