
सामना प्रतिनिधी । नगर
वर्षा अखेर 31 डिसेंबरच्या अनुषंगाने परराज्यातून येणाऱ्या अवैध दारूची विक्री नगर जिल्ह्यात होऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभाग दिवस व रात्र गस्त व संशयीत वाहनांची तपासणी करून करडी नजर ठेऊन आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात सात विशेष भरारी पथकाची स्थापना केली असून एक डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान 105 ठिकाणी कारवाई करून मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे अंतर्गत 83 आरोपींविरुद गुन्हे दाखल करून चार वाहनासह दमण निर्मित व गोवा राज्य निर्मित असा सुमारे 24 लाख 41 हजार 700 रुपायाचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती नवलकर यांनी दिली.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची विक्री होऊ नये.यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अहोरात्र गस्त घालून नाकाबंदी करून वाहन तपासणी करीत आहे. मद्यप्राशन करणार्यांनी शासनमान्य दुकानातूनच मद्द खरेदी करावे, तसेच मद्द पिण्याकरिता एक दिवसीय मद्द परवाना प्राप्त करावा. सार्वजनिक ठिकाणी मद्द प्राशन करू नये. अशा ठिकाणी दारूबंदी विभागाची करडी नजर आहे, अशी माहिती नवलकर यांनी दिली आहे.
































































