
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
थर्टी फर्स्ट साजरा करताना दोन युवकांमध्ये मारामारी होऊन एक जण जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्री शहरातील शेवगाव रोडवर घडली. या घटनेतील जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले असून या प्रकरणात गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना समजल्याने आज सायंकाळी उशिरा पोलिसांचे एक पथक नगर येथे रवाना झाले आहे. सायंकाळी उशिरा पर्यंत या प्रकरणी कोणत्याही गुन्हयाची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती.
एकमेकांचे मित्र असलेले दोन तरुण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काल रात्री भेटले मात्र या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत एक जण जखमी झाल्याने त्याला नगरला हलविण्यात आले. आज सकाळी या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरु झाल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली असता या घटनेतील एका युवकाने आपल्या कडील गावठी कट्ट्याने गोळीबार केला असता त्यातील गोळी दुसऱ्या तरुणाच्या हाताला चाटून गेली असल्याचे पोलिसांना समजल्या नंतर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत गोळीबार करणाऱ्या तरुणाच्या घरी जाऊन झडती घेतली असता तरुण सापडला नाही. या नंतर सायंकाळी उशिरा स्थानिक पोलिसांचे एक पथक नगरला रवाना झाले असून जखमी तरुणाचा ते जबाब घेणार आहेत. या संदर्भात पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना विचारले असता या प्रकरणात गावठी कट्याचा वापर झाला कि एअरगन चा वापर झाला ते समजु शकलेले नाही. पोलिसांचे एक पथक जखमी युवकाकडे चौकशी करण्यासाठी नगर येथे पाठवण्यात आले आहे. त्या नंतर काय तो सर्व प्रकार उघडकीस येईल.
































































