
सामना प्रतिनिधी । वाराणसी
प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन सत्तेवर आलेले आलिशान बंगल्यामध्ये राहत आहेत आणि रामलल्ला मात्र तंबूत! हे चित्र अतिशय संतापजनक आहे. मोदीजी, जोपर्यंत रामलल्ला तंबूत आहेत तोपर्यंत तुम्हीही बंगल्यात नाहीतर तंबूत राहा असे ठणकावत बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टाने चक्क तंबू पाठवला. यापुढे भाजपच्या प्रत्येक खासदार, आमदाराला आम्ही तंबू पाठवणार असल्याचेही या विद्यार्थ्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत अयोध्येतील राममंदिराच्या संदर्भात सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघेल, मात्र मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. ज्यांनी रामनामाचा जप करत सत्ता मिळवली त्यांनीच अशी पळपुटी भूमिका घेतल्याने समस्त हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठातही या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटले. विद्यार्थ्यांच्या एका गटाने ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे’ अशी बुलंद घोषणाबाजी करत विद्यापीठातील टपाल कार्यालय गाठले. या विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करून एक तंबू आणला आणि 68 रुपये खर्च करून स्पीड पोस्टाने तो पंतप्रधान कार्यालयाला पाठवला.



























































