प्रशासनाच्या कुचकामी धोरणामुळे बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सुकलेले नदीपात्र

सामना प्रतिनिधी । बीड

एकीकडे बीड जिल्हा टँकर मुक्त करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांची जलसंधारणाची कामे बीड जिल्ह्यात केली गेली मात्र, दुसरीकडे प्रशासनाच्या कुचकामी धोरणामुळे ग्रामीण भागाचे कसे वाटोळे झाले याचा धक्कादायक नमुना समोर आला आहे, बीड जिल्ह्यातच दुष्काळाची दाहकता जास्त का? तर याला कारणीभूत निसर्गासह प्रशासन सुद्धा आहे.

पाटोदा तालुक्यातील दासखेड हे सात हजार लोकसंख्येचे गाव. शेती हाच व्यवसाय. गावात मार्च एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणी साठा सदैव असायचा. उन्हाळ्यातही बागायत शेती फुलायची कारण 1985 ते 1990 च्या दरम्यान गावाभोवती पाच पाझर तलाव निर्माण झाले. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत नदीला पूर आला अन एका रात्रीमध्ये पाच ही पाझर तलाव भीतीला भगदाड पडल्याने फुटले पाणी तर वाहून गेलेच दोन वर्षात तलावात पाणीच साठले नाही. तलाव फुटल्यानंतर गावकऱ्यांनी लघु पाटबंधारे, जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आणि अतिवृष्टीत पाच पाझर तलावं उध्वस्त झाल्याची माहिती दिली. अधिकारी आले पाहणी केली. लोकप्रतिनिधींनीही आश्वासन दिले ते हवेतच विरले. आता दोन वर्षे उलटून गेली. एकीकडे जलसंधारणासाठी कोट्यावधीचा खर्च केला जात असतांना दुसरीकडे पूर्ण झालेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती प्रशासन करू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. आमच्याकडे नवीन कामाला निधी आहे. जुन्या कामाच्या दुरुस्तीसाठी निधी नाही, असे सांगितले जाते. पाझर तलाव फुटल्याने दासखेड दुष्काळाच्या खाईत लोटले गेले. यंदाच्या पावसाळ्यात सर्वात जास्त पाऊस दासखेड सर्कलमध्ये झाला. या पावसामुळे तालुक्याची आणेवारी वाढली गेली. एवढा पाऊस होऊनही पाणी मात्र राहिले नाही. दासखेडमध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टँकर उपलब्ध नाही. नळयोजना कुचकामी ठरली. गाव होरपळून निघाले. याला दोषी फक्त प्रशासन असेच म्हणता येईल.