उद्धव ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी दौरा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.  उद्धव ठाकरे बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे विशेष विमानाने सकाळी संभाजीनगर येथे आगमन होणार असून येथून हेलिकॉप्टरने ते बीडकडे रवाना होणार आहेत. बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर ते दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर बीड येथे सकाळी 11 वाजता आशीर्वाद लॉन्सवर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.

बीड येथील सभा आटोपून संभाजीनगरला परत येताना उद्धव ठाकरे हे जालना व बदनापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अंबड चौफुलीवर मातोश्री लॉन्स येथे दुपारी 2 वाजता तर बदनापूर येथे चाणक्य मंगल कार्यालयात दुपारी 3 वाजता ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. सध्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. खासकरून महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे हैराण झाला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी त्याच्या निवारणासाठी उपाययोजना सुरू झाल्या नसल्याची बहुसंख्य शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच कामगारही मोदी सरकारवर चिडलेला आहे. या कामगारांनी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे नेमकं काय भाष्य करतात आणि ते आज कोणावर आसूड ओढतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.