राफेल, लोकपाल, शेतीमालाच्या मुद्द्यावर अण्णांनी मोदी सरकारवर डागली तोफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

राज्याचे मुख्यमंत्री आता मोदींप्रमाणे वागू लागले आहे. मुख्यमंत्र्यांना मोदींचा वाण नाही पण गुण लागला आहे, अशी टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी करत मोदी सरकारवर तोफ डागली आहे. राफेल प्रकरण देशाला धोका असल्याचेही ते म्हणाले. राफेल, लोकपाल, लोकायुक्त आणि शेतीमालाच्या हमी भावावरून केंद्र आणि राज्य सरकारचा हेतू शुध्द नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीही आता मोदींप्रमाणे वागू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांना मोदींचा गुण लागलाय अशी टीका त्यांनी केली.

संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी सरकारने नाकारल्याने राफेलमध्ये घोटाळा असल्याची शंका अण्णांनी व्यक्त केली. सरकारला चौकशीची भीती का वाटते असा सवालही त्यांनी केला. राफेलप्रकरण देशाला धोका आहे, त्यामुळे आपण यासंदर्भात माहिती घेत असून नंतर यावर सविस्तर बोलू असे ते म्हणाले. मोदींनी निवडणुकीत आणि नंतरही खूप चांगली भाषणे केली. पण कथनीप्रमाणे ते वागत नाहीत. भाषणात ते चांगली अॅक्टिंग करून बोलतात,पण आता त्यांच्याबद्दलच्या आशा मावळल्या आहेत. माझ्या आंदोलनाचेही त्यांनी कौतुक करत भाषणे गाजवली पण अजूनही ते लोकपाल आणू शकले नाहीत. मोदींची हुकमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. सीबीआयच्या संचालकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश म्हणजे मोदी सरकारला खरमरीत चपराक असल्याचे ते म्हणाले.

लोकपालची नियुक्ती आणि लोकायुक्त कायद्याची निर्मिती होत नसल्याच्या विरोधात अण्णा 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषण करणार आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनांही पत्र पाठवलाय. या पत्राला अजूनपर्यंत दखल न घेतल्याने अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.