
सामना प्रतिनिधी । मुंबई
कुर्ला पूर्वेला असलेल्या नवीन म्हाडा कॉलनीला अखेर शिवसेनाप्रमुखांचे नाव मिळाले आहे. नवीन म्हाडा कॉलनी, शरद सोसायटी, कापूस कामगार आणि सिद्धेश्वर सोसायटी या परिसराचे ‘माननीय बाळासाहेब ठाकरे नगर’ असे नामकरण करावे अशी येथील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार म्हाडाने या कॉलनीचे ‘माननीय बाळासाहेब ठाकरे नगर’ असे नामकरण केले असून त्याबाबतचा ठराव प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कामगारांसाठी लढा दिला आहे. त्यामुळे कुर्ला पूर्वेला कामगार नगराच्या पुढे उभ्या राहिलेल्या नवीन म्हाडा कॉलनीला ‘माननीय बाळासाहेब ठाकरे नगर’ असे नाव देण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात होती. त्याची दखल घेत शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या सहकार्याने कॉलनीच्या नामकरणासाठी म्हाडाकडे पाठपुरावा केला. त्यास अखेर यश आले, अशीं माहिती कुडाळकर यांनी दिली.



























































