
सामना प्रतिनिधी । कल्याण
कल्याण-डोंबिवलीतील जनतेसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘सिटी पार्क’ कामाचा प्रारंभ झाल्यानंतर आता शिवसेनेने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. ठाण्याच्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या ‘सॅटिस’ प्रकल्पाची 300 कोटींची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली असून येत्या 15 दिवसांत प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडीतून कल्याण रेल्वे, बस स्थानक परिसराची कायमची मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोरियन सरकारच्या सहकार्याने कल्याण-डोंबिवलीचा कायापालट होणार आहे. कल्याणमधील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेने कल्याण रेल्वे आणि बस स्थानक परिसराचा मेकवोव्हर करण्याचे आश्वासन दिले होते. याचाच भाग म्हणून पालिकेने ठाण्यातील सॅटिसच्या धर्तीवर कल्याण रेल्वे आणि बस स्थानक परिसराचा कायापालटची योजना हाती घेतली आहे.
रेल्वे, एमएमआरडीए, नगरविकास खाते आणि पालिका अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी कल्याण- डोंबिवली विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन असून येत्या 15 दिवसांत प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.
एकाच ठिकाणाहून रेल्वे – एसटीची सेवा
सॅटिस योजनेत रेल्वे स्थानक परिसरात स्काय वॉक बांधून पूर्व आणि पश्चिम हे शहराचे दोन्ही भाग एकत्र जोडले जाणार आहेत. यामुळे वाहतूककोंडी तर कमी होणार आहेच शिवाय एकाच ठिकाणाहून रेल्वे आणि एसटीची सेवा प्रवाशांना घेता येणार आहे. शिवाय एसटीसाठी सुसज्ज इमारत, बैलबाजार ते सुभाष चौकपर्यंत स्कायवॉकही बांधण्यात येणार आहे.



























































