कारवाईचा इशारा देताच शाळेचे अर्धवट काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी

कणकवली तालुक्यातील खारेपाटण रामेश्वरनगर जि. प.शाळेचे काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देताच संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण करून दिले खरे. मात्र शाळेत विद्युत कनेक्शन अद्याप नसल्याने ही शाळा ताब्यात घेवून त्याचे उदघाटन कसे काय करावे असा प्रश्न सदस्य रविंद्र जठार यांनी सभेत उपस्थित केला. यावर शाळेला खासगी विद्युत टेक्नीशियन मार्फत विद्युत कनेक्शन तात्काळ दया असे आदेश जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी आजच्या सभेत दिले.

जि.प. बांधकाम समितीची मासिक जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रभारी समिती सचिव तथा कार्यकारी उपअभियन्ता, समिती सदस्य रविंद्र जठार, प्रदीप नारकर, राजेश कविटकर, स्वरूपा विखाळे, उपअभियंता, अधिकारी खातेप्रमख आदि उपस्थित होते.

कणकवली तालुक्यातील खारेपाटण रामेश्वरनगर जि. प.शाळेचे नव्याने बांधकाम करण्यात आले. मात्र या शाळेची इमारत पूर्ण झाली असली तरी दरवाजे, खिडकीचे ग्रिल, फर्स आदि कामे अर्धवट असल्याकडे सदस्य जठार यांनी मागील सभेत सभागृहाचे लक्ष वेधले होते. तसेच अर्धवट काम ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबधित ठेकेदाराला काम करण्याची सूचना देत कारवाई करण्याचे पाऊल जि. प.प्रशासनाने उचलले होते. या कारवाईची धास्ती घेत ठेकेदाराने अर्धवट काम पूर्ण करून दिले असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. यावर अर्धवट कामे पूर्ण झाली असली तरी या इमारतीला अद्याप विज जोड़नी तसेच अंतर्गत लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले नाही याकडे लक्ष वेधत १७ जानेवारीला या शाळेचे उदघाटन आहे असेही सांगितले. मात्र लाईट सुविध नसेल तर इमारत ताब्यात घेवून उदघाटन कसे काय करणार असा प्रश्न जठार यांनी उपस्थित केला. यावर बांधकाम विभागाने खासगी इलेक्ट्रीशियनकडून इमारतीला वीजजोडणी करून घ्या, असे आदेश जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी सभेत दिले.
शिक्षण विभागाच्या कामगिरीबाबत प्रदीप नारकर यांची नाराजी

देवगड तालुक्यातील नादभोई जि. प.शाळा पूर्णतः नादुरुस्त झाली असून त्या शाळेच्या ठिकाणी नवीन इमारत व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र चार सभा झाल्या तरी निर्लेखन प्रस्ताव शिक्षण विभागकडे प्राप्त झाला नसल्याने सदस्य प्रदीप नारकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच निलेखन होत नसल्यास या धोकादायक शाळेमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित केला. यावर अद्याप शिक्षण विभागाकडे आपल्याकडे निलेखन प्रस्ताव आला नसल्याचे सांगण्यात आले. यावर गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून तात्काळ प्रस्ताव मागवून घ्या असे आदेश जि. प.अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी सभेत दिले.

महिन्यापूर्वी सदस्यांच्या समस्यांचे निरसन करा
जनतेच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधन्यासाठी सदस्य विविध प्रश्न सभागृहात उपस्थित करत असतात तसेच त्यांच्या समस्या मांडत असतात. त्यामुळे सदस्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांची पुढील सभेचे वाट न बघता त्यांच्या समस्यांचे निरसन करा असे आदेशही जि. प.अध्यक्षांनी सभेत दिले.