
सामना प्रतिनिधी । प्रयागराज
कुंभमेळ्यात दोने भाऊ किंवा भाऊ-बहीण हरवतात आणि कित्येक वर्षांनी पुन्हा भेटतात. अनेक जुन्या सिनेमांचे कथासूत्र कुंभमेळ्याभोवतीच फिरायचे. पण,आता कुंभमेळ्यात असे घडणार नाही. कारण,कुंभमेळ्यात येणार्या 14 वर्षांखालील प्रत्येक मुलाला आरएफआयडी अर्थात रेडियो फ्रिक्वेंसी ओळख टॅग लावण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीत कुणी मूल हरवले तरीही ते कुठे आहे हे पोलिसांना चुटकीसरशी शोधता येणार आहे.
कुंभमेळ्यात पुढच्या 50 दिवसांत तब्बल 12 कोटी लोक येण्याची शक्यता आहे. यात 14 वर्षांखालच्या मुलांची संख्याही मोठी असते. अनेकदा मुले या कुंभमेळ्यातल्या गर्दीत हरवतात. प्रचंड गर्दीत त्यांना शोधणे मुश्कील होऊन बसते. यावर उपाय म्हणून आरएफआयडी टॅग मुलांना लावण्यात येणार आहे. या सुविधेसाठी व्होडाफोनचे सहकार्य लाभले असून कुंभमेळ्यात 40 हजार टॅग वापरण्यात येणार असल्याची माहीती राज्याचे पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी दिली.
काय आहे आरएफआयडी
आरएफआयडी ही एक वायरलेस सुविधा आहे. या सुविधेच्या माध्यमातून कुठल्याही बेपत्ता व्यक्तिचा शोध घेण्यासाठी इलेक्ट्रो-मॅग्नेटिक स्प्रेक्ट्रमची रेडियो फ्रिक्वेंसी असलेल्या भागात विद्युत चुंबक किंवा इलेक्ट्रोस्टेटिक कपलिंगचा वापर करण्यात येईल. या सुविधेसाठी व्होडाफोनचे सहकार्य लाभले आहे.
41 सेकंदांपेक्षा जास्त वेळ डुबकी मारता येणार नाही
कुंभमेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे. एकाचवेळी जास्त लोक स्नान करण्यासाठी गोळा झाल्यास चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठीच कुंभमेळ्यात केवळ 41 सेकंदच डुबकी मारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दिगंभर आखाड्याजवळ आग
कुंभमेळ्यात आज सोमवारी दिगंबर आखाड्याजवळच्या एका तंबूला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली होती. या आगीत जीवितहानी झाली नसल्याचे कुंभमेळा सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

























































