नगराध्यक्षांच्या हट्टामुळे विकास कामाला सुरुवात होईना! नगरसेवकांनी केले उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
beed-drainge-system

उदय जोशी । बीड

बीड शहरातील नागरिकांच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या 154 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेत जाणिवपूर्वक दिरंगाई करून संपूर्ण शहराला वेठीस धरणाऱ्या नगर परिषद आणि नगराध्यक्षांच्या विरोधात संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांनी उपोषण पुकारले असून समर्थकांसह नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

बीड शहरासाठी केंद्र सरकारच्या अमृत अभियाना अंतर्गत पाणी पुरवठा, भुयार गटात, हरितक्षेत्र विकास, छोटी उद्याने या योजना मंजूर झाल्या आहेत. या तिन्ही योजना अमृत योजनेचाच भाग आहेत. योजनेचे उद्घाटन शहरातील वेगवेगळ्या भागात किमान दहा वेळेस करण्यात आले. केवळ उद्घाटने करण्याचा घाट नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर घालत आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर नगरपालिका प्रशासन नाचत आहेत. चार महिन्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता भांबरे यांनी 154 कोटी रुपयाच्या कामाचा कार्यारंभ करण्याचे आदेश दिले. मात्र चार महिने उलटूनही एजन्सी तयार असताना योजनेचे काम रेंगाळत पडले आहेत. केवळ आणि केवळ नगराध्यक्षांच्या हट्टापोटी विकासकाम सुरू होत नसल्याने संपूर्ण शहर वेठीस धरले जात आहे. अटल अमृत योजनेचे काम तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी अखेर संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते फारूक पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, भैय्यासाहेब मोरे, रंजित बनसोडे, प्रभाकर पोपळे, शेख आमेर, बिभीषण लांडगे यांच्यासह समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारले आहे.