भरलं घर नांदतं गोकुळ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर, [email protected]

निर्माते शशांक सोळंकी… डॉली, रमा, मंजिरी, मिठ्ठू नावांची यादी संपतच नाही. असं भरलं घर घरातील माणसांच्या संवेदनाशीलतेची साक्ष देतं…मला तारीखही पक्की आठवतेय 7 जुलै 2003. आमचा ‘वादळवाट’ मालिकेचा पहिला एपिसोड टेलिकास्ट होणार होता. म्हणून शूटिंगनंतर बघूया ठरवून सगळे सेटवर जमले होते. मोठा स्क्रिन लावला होता आणि शूटिंग करताना संध्याकाळी बाहेरून कुत्र्यांचा रडण्याचा आवाज यायला लागला. तीन-चार बारीकशी पिल्लं आणि त्यांची आई गाडीचा धक्का लागून जस्ट वाचले होते. शशांक आमचा निर्माता. शशांक गणेश सोळंकी धावत बाहेर आला/गेला. त्या कुत्रीला जवळ घेतलं. लागलेल्या पायाला अलगद धरून बसवलं. एक पुठ्ठय़ाचा मोठा बॉक्स आणून पिल्लांना आधी बॉक्समध्ये सेफ ठेवलं. मग त्यांच्या आईला पाणी पाजलं. जखम नीट स्वच्छ करून मलम लावलं. पिल्लांना दूध प्यायला म्हणून एकेक करून त्या कुत्रीच्या पोटाशी धरलं. दूध पिऊन झाल्यावर छान त्या बॉक्समध्ये कागद टाकून जो बेड केला होता त्यावर पिल्लांना झोपवलं. थोडं बरं वाटल्यावर ती कुत्री चालायला लागली, पण पुढचे अनेक दिवस इथं माझी छान काळजी घेतली जाणार आहे. माझ्या पिल्लांना सांभाळलं जाणारय… इजा पोहोचवणार कुणी नाही… इथे आम्हाला फक्त प्रेम मिळणारय, असा विश्वास तिला मिळाला… आणि तो शशांकने दिला तिला. खरं तर कुठल्याही प्राण्याचं इतक्या आपुलकीनं करताना (आपलं नसतानाही) मी पहिल्यांदा बघितलं होतं.

त्या दिवशी वाटलं आपण माणसांशी जोडलं गेलोय… आज खूप वर्षांनी जेव्हा ‘जीवलग’च्या निमित्तानं बोलायचं ठरलं तेव्हा शशांक म्हणाला, प्राणी आमच्याकडे सगळय़ांनाच खूप आवडतात. मुळात शेतकरी बॅकग्राऊंडमधून आलो असल्यानं त्या जमिनीतल्या अळय़ा, मुंग्या, विंचू यांच्याशीही दोस्तीच होती. मग कळायला लागल्यापासून आपण कुत्रा घेऊया असं वाटायला लागलं. हो-नाही करत 1 महिन्याचं एक पॉमेरियन पिल्लू आलं घरी… आणि आमचं आयुष्य 360 अंशमध्ये बदललं. अचानक एक नवं लहान बाळ आयुष्यात आलं. लहान लहान वाटलं सुरुवातीला, पण लोक आमचा मोठा भाऊ, वडीलच निघाला. घरी आलो की, एखादा कुत्रा धावत अंगावर येऊन उडय़ा मारतो ना पण बेल वाजवून दरवाजा उघडला तरी शेठ बसूनच आपली… आम्ही त्यांच्याजवळ जाऊन त्यांना, तिला गोंजारायचं. डॉली नाव तिचं. दिसायलाही तशीच होती पॉमेरियन डॉली.

petts

ती ठरवायची आम्ही काय करायचं ते. आमचे शूज लपवून ठेवायची, सगळे बॉल कुरतडून ठेवायची. आम्ही लपून बाहेर खेळायला निघालो की दरवाजाकडे जाताच जोरजोरात भुंकून आईकडे कम्प्लेंट करायची… तिच्या मनात असलं तरंच गोंजारू द्यायची. आई-बाबांची मात्र ती लाडकी आणि तिचे ते… त्यांचं सगळं ऐकायची. छान राहायची. मात्र आम्हाला जेवणाचा भारी कंटाळा होता… दूध-भात द्या, चिकन द्या, अंडे द्या, पेट फूड द्या… मी हातानं काही जेवणार नाही, गपचूप मला भरवायचं. तेही लाड करवून घेण्याचं टेक्निक… तिला ना न्यूरॉटिक डिसऑर्डर होती. आकडय़ा यायच्या कधी कधी. त्यामुळं जरा सांभाळावं लागायचं, पण कितीही त्रास झाला तरी घरात शी शू नाही करायची. ती असतानाच आमच्याकडे एक मिट्टू नावाचा पोपट होता. लव्ह बर्डस् होते. एक जखमी झालेला बहिरी ससाणा उचलून आणला होता. दोन दिवस एक जखमी साप आणला होता. आणि हे सगळं 200 स्क्वेअर फिटच्या छोटय़ाशा घरात. तर डॉली आणि मिट्टूची मैत्री विशेष. तसंही मुलीशी/स्त्रियांशी पोपटांची पटकन दोस्ती होते. मिट्टूला काही खायला दिलं की तो डॉलीच्या नावानं ओरडायचा आणि पिंजऱयातून तिच्यासाठी एक घास खाली टाकायचा. टाकलेला घास डॉलीनं उचलायच्या आत एखादं मांजर दिसलं तर जोरात तो ‘डॉली डॉली’ ओरडायचा. खायला हवं असलं की तो ‘मिट्टूला पेरू, मिट्टूला पेरू’ म्हणायचा. गंमत बघ तू, लव्ह बर्डस् बोलत नाहीत. आपल्याला कळत नाही असे वाटतं, पण तेसुद्धा ‘मिट्टूला पेरू’ करून ओरडायचं. त्या आपण मिट्टू नाही आहोत हे कळायचं नाही. खूपच धम्माल.

आमची डॉली 18 वर्षे जगली. ती साधारण 12 वर्षांची असताना तिला थोडा हेल्थ इश्यू व्हायला लागला. मग चीडचीड करायला लागली. तिला कंपनी म्हणून अजून एक बेबी आणायचं ठरलं. ‘चैती’ आणखी एक पॉमेरियन आलं घरात. चैती कुत्राच होती. टिपिकल. चैती आली तेव्हा अंधेरीच्या मोठय़ा घरात शिफ्ट झालो होतो. अत्यंत उत्तम ट्रेनिंग झालं चैती आणि डॉलीचं. मुळात म्हणजे डॉली स्वतःचं स्वतः खायला लागली. कारण चैती समोर येईल ते उडवायची स्वतःचं पण आणि दुसऱयाचं पण. तीन-चार वेळा डॉलीचं जेवण संपवलं. आम्हाला वाटलं डॉली जेवली म्हणून… आम्ही रिलॅक्स. उपाशी राहायला लागल्यावर अक्कल आली बाईंना… आणि जेवण आलं की पहारा देत स्वतःचं स्वतः जेवायला लागली. चैती आली तेव्हा माझं लग्न झालं होतं. रश्मी (बायको माझी) तिच्याशी मस्त मैत्री. काही काळानं आम्हाला मुलगी झाली. इश्वा… 9 महिने सतत रश्मीबरोबर राहून चैती इतकी सुंदर काळजी घ्यायची तिची… इश्वा झाल्यावर चैतीला असं वाटायचं की तिचंच बाळ आहे. कुठेही अतिशयोक्ती नाही, पण जेवली ती आणि इश्वा रडायला लागली की हिला पान्हा फुटायचा. घरभर दूध गळायला लागायचं… बापरे इतका जीव? इश्वा रडत असताना रश्मी स्वयंपाक करीत असेल तर धावत येऊन खूप भुंकायची. जणू ते सगळं सोड आधी बाळाला बघ. बाजूला बसून असायची. ती उठली की भुंकून बोलवायची रश्मीला… मला…

एकदा इश्वा उठली आणि रडायला लागली. कूरकूर करायला लागली. हात पिठानं, कणकेनं भरले होते. ते धुवून जाईपर्यंत इश्वाने केलेली पॉटी चैतीने चाटून पुसून स्वच्छ केली होती. इश्वाही रडायची थांबली. तिथंच उभं राहून चैतीने जणू रश्मीकडे असं बघितलं, ‘हे बघ हेही मला जमतेय आता. तुझ्याशिवाय नाही अडणार आहे काही. शप्पथ सांगतो, हे आज इतक्या वर्षांनी आठवून बोलतोय कुणाशीतरी.. भरून आलंय.

डॉली 17 वर्षे जगली, पण कधीच माझ्या भावाला तिला हात नाही लावू दिला. एक दिवस ती जरा मलूल बसली होती. भावानं विचारलं. पाठीवरून हात फिरवला. पण भुंकलीच नाही. शांतपणे गोंजारू दिलं. मांडीत जाऊन बसली. काही वेळानं मी आलो. काय होतंय म्हणून मिठी मारली. तीच शेवटची… माझ्यासाठी थांबली होती माझी बहीण. मग चिकू आला रॉट हॉयलर… इवलसं पिल्लू आणलं होतं… त्याला फिरवायला रश्मीला खूप आवडायचं. ते पिल्लू धरून खेचायचं ही आपली त्याच्या मागे… बघता बघता त्या पिल्लांचा 10 महिन्यांत धष्टपुष्ट रॉट व्हॉयलर गडी झाला. वॉक करताना रश्मीला खेचायचा. तिला काही ते झेपायचं नाही. एक दिवस तीनं धरलेलं असताना एका पक्ष्याच्या मागे धावला आणि इकडे धडाम्धुडूम मॅडम पडल्या. अशी गंमत… तो गेल्यावर बरीच वर्षे एकही कुत्रा, प्राणी नव्हताच घरी. खूप वाटायचं कुणीतरी हवं, पण बिझी शेडय़ूलमध्ये 100 टक्के जबाबदारी घेणं शक्य नव्हतं आणि फायनली मोठं फार्म हाऊस घेतलं. मुंबईपासून जवळच. मस्त गावठी कुत्री आणली. फार्मवर वेगवेगळे पक्षी आले, कोंबडय़ा आल्या, दोन गाई घेतल्या. ऑर्गेनिक शेती करायचं ठरवलं. घर अगदी भरल्यासारखं झालं. मुंबईला करमेचना. विकेण्ड आला की आम्ही फार्मवर. रमा आणि मंजिरी अशी गायींची नावं. माझ्या मालिकेतल्या दोन जवळच्या नायिकांची नावं त्यांना दिली. छोन छान वाटायचं. मुळात गाय हा गरीब प्राणी नाही हे कळलं. अत्यंत हुशार, बदमाश असतात अगं त्या. आंघोळीला घ्यायचं म्हणजे जीव निघायचा. एकदा सोडलं की चार-चार तास हातातच लागायच्या नाहीत. प्रेम दाखवायची पद्धत खूप वेगळी असते त्यांची.

रमा खूप प्रेमळ, साधी होती. छान प्रेम करून द्यायची. मंजिरी मात्र उथळ, मस्तीखोर… हातच लावू देत नाही मला आजही… मंजिरीला पुरणपोळी आवडते खूप… मुंबईहून गेल्यावर आधी हातात पुरणपोळी दिसली तर जवळ येणार. नाही तर अक्षरशः पाय आपटून थैमान घालणार. पुरणपोळी भरवतानाची दोन-तीन मिनिटे काय ते हात लावू देणार. नंतर परत किप टू डिस्टन्स.

एक दिवस अचानक रमा गेली. परीक्षण केलं तेव्हा साप चावल्याचं कळलं. खूपच हळहळलो. सगळेच. मंजिरी पण. रमा गेल्यावर दोन-तीन दिवस हात लावू दिला मला तिनं. रडली ती पण. सख्खी मैत्रीण हरवली होती तिची. पण महिनाभरानं पुन्हा जैसे थे.गमतीचा भाग वेगळा, पण माणसं आयुष्यात येतात-जातात. प्राणी मात्र येतात ते फक्त चटका लावून जाण्यासाठी. जवळ नसतानाही असण्यासाठी.